मिशन वरखेडे; बेशुद्ध करणार अथवा गरज पडल्यासच गोळी झाडणार
चाळीसगाव– निष्पाप सहा जणांचा बळी घेणार्या नरभक्षक बिबट्याच्या बंदोबस्तासाठी हैद्राबादच्या रेस्न्यू वाईल्ड लाईफ एनजीओ संस्थेचे सदस्य असलेल्या व देशातील प्रमुख दहा शार्प शुटरपैकी एक असलेल्या नवाब शफहातअली खान हे वरखेडे खुर्दमध्ये मंगळवारी दाखल झाले आहेत. त्यांच्या सोबत दिल्ली व औरंगाबादमधील अन्य चार शार्प शुटर्स आहेत. अनेक छोट्या-मोठ्या रेस्न्यू ऑपरेशनमध्ये लिलया जबाबदारी पार पाडणारे खान यांना शासनाने वरखेडे येथील बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पाचारण केले आहे. विशेष म्हणजे या कामासाठी ते कुठलाही मोबदला घेत नाही तर आजोबा व वडीलांच्या कामाचा वारसा चालवत जनतेच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी खांद्यावर घेतली आहे. बिबट्याला ठार मारण्याऐवजी आधी बेशुद्ध करून त्यास जेरबंद करण्याचा त्यांचे प्रथम प्राधान्य राहणार आहे.