हॉकर्संचे 1 मार्चपासून होणार सर्व्हेक्षण

0

जळगाव । महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात शहर पथ विक्रेता समितीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपमहापौर गणेश सोनवणे, अप्पर आयुक्त राजेश कानडे, डीवायएसवी सचिन सांगळे, शहर पोलिस निरीक्षक प्रदिप ठाकूर, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार उपस्थित होते. परंतु, कोरम पुर्ण न झाल्याने बैठक तहकूब करण्यात आली. दरम्यान, अप्पर आयुक्त राजेश कानडे यांनी समितीमधील इतर सदस्यांशी अनौपचारीक चर्चा केली. त्यांनी जे सदस्य कायम गैरहजर असतात त्यांना काढून हॉकर्स समस्या जाणकार असलेल्या इतर सामाजिक संस्था आदींच्या सदस्यांचा या समितीत समावेश करण्यात यावा तसेच याबाबत पुढील बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात यावे असे ठरविण्यात आले.

गैरहजर राहणार्‍यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी
समितीत एकूण 32 सदस्य असून त्यातील 12 सदस्य नेहमीच गैरहजर राहत असल्याने याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी शहरातील सर्व हॉकर्सचे सर्व्हेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर आयुक्त कानडे यांनी दिली. यासाठी हॉकर्स ज्या ठिकाणी व्यवसाय करतो तेथे प्रत्यक्ष जावून हे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. याची सर्व माहीती दिल्ली येथील सर्व्हेवरमध्ये साठविण्यात येणार आहे. सर्वेक्षण करतांना हॉकर्सने मोबाईलनंबर जो आधारकार्डशी लींक आहे तो देणे बंधनकारक आहे. तसेच यासोबत रहीवास प्रमाणपत्र, रेशनकार्ड, जात प्रमाणपत्र, अपंग असल्यास प्रमाणपत्र, विधवा तसेच परिक्त्यांचा असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे. ही सर्व्हेक्षणाची प्रक्रीया 90 दिवसांत पूर्ण करण्यात येणार असून प्रत्येक झोनसाठी पाच दिवस देण्यात येणार आहे. एका महिन्या कालवधीत हॉकर्स बांधवांनी आधारकार्ड मोबाईल नंबरशी लींक करावे असे आवाहन अप्पर आयुक्त कानडे यांनी केले. तसेच प्रत्यक्ष सर्वेक्षण 1 मार्चपासून करण्यात येणार असल्याचे कानडे यांनी यावेळी जाहीर केले.