हॉकर्सची मनपा वाहनावर दगडफेक; काच फोडली

0

जळगाव । शहरातील घाणेकर चौक ते भिलपुरा चौकादरम्यान मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने कारवाई केली. या कारवाई दरम्यान हॉकर्स व अतिक्रमण विभागाच्या पथकातील कर्मचार्‍यांमध्ये वाद झाला. यावेळी एका हॉकर्सने मनपाच्या वाहनावर दगडफेक करून वाहनाच्या काचा फोडल्याची घटना सायंकाळी 5.50 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. या घटनेत अतिक्रमण विभागाच्या वाहनावरील चालकाला दुखापत झाली आहे.

हॉकर्स, मनपा कर्मचारी शाब्दीक चकमक
याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, घाणेकर चौक ते भिलपुरा चौकादरम्यान आनंदा महाजन यांच्या घराजवळ मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाची कारवाई सुरु होती. या कारवाई दरम्यान हॉकर्स व अतिक्रमण यांच्यात जोरदार वाद झाला. यावेळी हॉकर्सने सायंकाळची वेळ आहे. दुकाने लावू द्यावी असे सांगितले. अतिक्रमण विभागाच्या पथकाने या हॉकर्सच्या दुकानातील सामान जप्त केल्याने हॉकर्स व अतिक्रमण विभागातील कर्मचारी यांच्यात जोरदार शाब्दीक चकमक झाली. यावेळी कृष्णा सुभाष ठाकुर रा. वाल्मिक नगर या भाजी विक्रेत्यांने मनपाच्या अतिक्रमण विभागाचे वाहन क्रमांक एमडब्ल्युडी 6597 च्या काचेवर त्याच्या दुकानावरील अर्धा किलो वजनाचे माप व फरशीचा मोठा तुकडा मारून फेकला. यात अतिक्रमण विभागाच्या वाहनावरील चालक सादीक अली आबीद अली यांच्या छातीत काचेचा तुकडा घुसल्याने त्यांना दुखापत झाली. या घटनमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती कळताच शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून जमावाला पांगविले.

भाजी विक्रेत्यास घेतले ताब्यात
घाणेकर चौक ते भिलपुरा पोलिस चौकी दरम्यान मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाची कारवाई सुरु होती. या कारवाई दरम्यान वाद झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे अनर्थ टळला. मात्र, या घटनेमुळे चांगलीच गर्दी जमली होती. घटनेची माहिती कळताच शनिपेठ पोलिस स्टेशनचे पीएसाआय बी.बी.शिंदे यांच्यासह पोलिस कर्मचारी जितेंद्र सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेवून जमाव पांगवून भाजी विक्रेता कृष्णा सुभाष ठाकुर याला ताब्यात घेवून त्याला पोलिस स्टेशनला आणले. त्याच्याविरुध्द वाहनचालक सादीक अली यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.