हॉकर्सचे आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन

0

जळगाव । शहरातील हॉकर्सं यांना स्थलांतरीत करुन महापालिकेने महामार्गावरील समांतर रस्त्यावर हॉकर्सला जागा दिला होती. मात्र न्हाईने (महामार्ग प्राधिकरण) त्यांना हटविल्याने मुळ जागेवर टाईम झोननुसार व्यवसाय करण्याची मागणी या हॉकर्सनी केली आहे. आयुक्तांच्या दालनाजवळ हॉकर्सनी ठिय्या आंदोलन केले.सुप्रिम कोर्टाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार शहरातील प्रमुख रस्त्यांवरील व वाहतुकीस अडथळा होणार्‍या 11 ठिकाणांवरील सुमारे 892 हॉकर्सचे पयार्यी जागेत स्थलांतर करण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने टप्प्या टप्प्याने हॉकर्सचे स्थलांतर केले आहे. या स्थलांतर्गत सागर पार्कवरील 32 हॉकर्सला राष्ट्रीय महमार्गालगत शासकीय आयटीआयजवळील जागा देण्यात आली होती. तसेच बहीणाबाई उद्यानाच्या समोरील 36 हॉकर्स यांना महामार्गालगतच बहीणाबाई उद्यानाच्या मागे जागा देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच न्हाईने समांतर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम महापालिकेच्या मदतीनेच हातात घेतली. त्यावेळी या हॉकर्सला स्थलांतरीत
करण्यात आलेल्या हॉकर्संला पुन्हा त्यांचया जागेवरुन हटविण्यात आले आहे. यासोबतच काव्यरत्नावली चौकात भाऊंचे उद्यान सुरु केल्याने तेथील 22 हॉकर्स देखिल हटविण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून व्यवसाय बंद असल्याने या हॉकर्स व त्यांचे कुटुंबिय हवालदिल झाले आहेत. त्यामुळे आता जे हॉकर्स ज्या जागी होते त्याच मुळ जागी टाईम झोननुसार व्यवसाय करु द्यावा अशी मागणी या हॉकर्सनी आयुक्त जीवन सोनवणे यांना केली आहे. दरम्यान आयुक्तांच्या दालनासमोर हॉकर्सनी ठिय्या आंदोलन करुन मागण्याचे निवेदन दिले. व्यवसाय बंद झाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक हॉकर्सनी कर्ज घेतले असून त्याची फेड करणे अवघड झाले आहे. मागणीची दखल न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा शहर हॉकर्स व टपरीधारक संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी आयुक्तांनी पर्यायी जागा देण्याबाबत सकारात्मक विचार करीत असल्याचे आश्वासन दिले. आंदोलनात दिनेश हिंगणे, सुनिल सोनार, मोहन तिवारी व सुनिल जाधव यांच्यासह हॉकर्स प्रतिनिधी यांनी सहभाग घेतला.