जळगाव । ‘आम्हाला न्याय मिळालाच पाहीजे’ व ‘हॉकर्सच्या मुलांची फी आयुक्त भरणार का?’ अश्या घोषणा देत फुले मार्केटमधील हॉकर्स बांधावांनी राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चाद्वारे धडक दिली. कुटुंबासह हॉकर्सनी सतरामजलीसमोरील रस्त्यावर ठिय्या मांडून काहीवेळ रस्ता रोखून धरल्याने गोंधळ झाला. यावेळी जुन्या सानेगुरुची रुग्णालयाच्या जागेवर व्यवसाय करुन देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. या मागणीस नकार देत महासेभसमोर प्रस्ताव ठेवण्याचे आश्वासन प्रभारी अप्पर आयुक्त कानडे यांनी दिले.
महापालिकेकडून गेल्या महीन्यांपासून शहरातील नो हॉकर्स झोनवरील हॉकर्सविरुध्द धडक मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहीमेला हॉकर्सकडून विरोध करण्यात येत आहे. या मोहीमेतून महापालिका मालकीच्या महात्मा फुले व सेन्ट्रल फुले मार्केट मार्केटमधील हॉकर्सला देखिल बाहेर काढण्यात आले आहे. आज मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महानगरतर्फे फुले मार्केटमधील हॅकर्सचा पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष निलेश पाटील, हॉकर्स युनियनचे नंदु महाजन मोर्चाच्या पुढे होते. हॉकर्स सोबत हातात दप्तर व शाळेचा गणवेश घालून मलेही सहभागी झाली होती.
सतरा मजलीसमोर ठिय्या ; रस्ता रोखला
मोर्चा पालिकेसमोर पोहचताच पोलिसांनी प्रवेशद्वाराच रोखून धरला. सर्वांना आत सोडण्यास पोलिसांनी नकार दिल्याने हॉकर्सने सतरा मजली इमारतीसमोरच बसून ठीय्या मांडला. आंदोलकांनी हातात फलक धरून घोषणाबाजी सुरु केली होती. यामुळे रस्त्यावरची वाहतुक ठप्प झाली तर पालिकेचा प्रवेश देखिल बंद झाला. घटनास्थळी गोंधळ सुरु झाल्याने डिवायएसपी सचिन सांगळे पोहचले. त्यांनी रस्ता अडवू नका म्हणून आंदोलकांची समजूत घातली. हॉकर्स ऐकत नसल्याने कारवाईचा बडगा उगारुन सांगळे यांनी रस्ता मोकळ करुन घेतला.यानतंर मागण्यांचे निवेदन अप्पर आयुक्त राजेश कानडे यांनाच द्यायचा आग्रह करीत हॉकर्स तेथेच थांबून राहीले. थोड्याच वेळात कानडे पालिकेत दाखल झाले. त्यांना भेयण्यासाठी निलेश पाटील, नंदु महाजन यांच्यासह शिष्टमंडळ त्यांच्या दालनात गेले.
बायोमेट्रीक सर्वेक्षण
हॉकर्सतर्फे निलेश पाटील यांनी मोहीमेला विरोध करुन हॉकर्ससाठी पर्यायी जागेची मागणी केली. त्यांनी बळीरामपेठ, सुभाष चौकातील हॉकर्सला जुन्या सानेगुरुजी रुग्णालयातील जागेवर तर फुले मार्केटमधील हॉकसला जुन्या नगरपालिकेच्या इमारतीची जागा पर्याय म्हणून देण्याची विनंती केली.यावर महासभा निर्णय घेईल तो प्रस्ताव स्थायी समोर ठेवण्याचे आश्वासन कानडे यांनी दिले. तोपर्यंत हॉकर्सवर कारवाई करुन नये अशी भूमिका पाटील यांनी मांडली. त्यावर कानडे यांनी हॉकर्स नो हॉकर्स झोनवर बसल्याच कारवाई करणारच असा पावित्रा घेतला. त्यामुळे सकारात्मक चर्चा झाली नाही. अप्पर आयुक्त कानडे यांनी लवकरच हॉकर्स झोनमधील विक्रेत्यांचे बायोमेट्रीक सर्व्हेक्षण करीत असल्याचे सांगीतले. कानडे यांनी फुले मार्केटमध्ये हॉकर्सला बसता येणार नाही असे सांगीतले. यावर मार्केटमध्ये गाळेधारकांनी केलेले अतिक्रमण त शहरातील अनधिकृत बांधकामांचे काय ? असा सवाल पाटील यांनी केला.