जळगाव । शहरातील सुभाष चौक रस्त्यावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अतिक्रम मोहीम सुरु होती. चौबे शाळेजवळील गल्लीत नो हॉकर्स झोनमध्ये बटाटे विक्रेत्याचे साहीत्य जप्त करत असतांना वाद झाला. या वादाचे रुपांतर बाचाबाचीत होवून विक्रेत्याकडून पथकातील कर्मचार्यास तराजूने मारहाण केल्याने तणाव निर्माण झाला होता. आज गुरुवारी सकाळी भाजीपाला व फळविक्रेत्यांनी बाजारपेठेत दुकाने थाटली होती. अतिक्रमण विभागाचे वाहन येतांना दिसताच हॉकर्स व फळविक्रेत्यांत पळापळ सुरु झाली. ख्जॉमियाजवळ कारवाई ख्वॉजामिया चौकात एका केळी विक्रेता अल्ताब बागवान यांची केळीची हातगाडी पकडली असता माझे वडिल महानगरपालिकेत नोकरीला आहे, असे सांगितल्यावर दम दिला मात्र विभागाने कारवाई केली.
पोलिसांनी मिटवला वाद
अतिक्रमण विभागाच्या वाहनातून आलेल्या पथकाने गल्ल्यांमध्ये तेथे पोहचून हातागाड्या व विक्रेत्यांनी ठेवलेल्या वस्तूंचे टोपले जप्त करण्यास सुरुवात केली. यावेळी चौबे शाळेजवळील इस्लामपुरा गल्लीत पथक गेले. नो हॉकर्स झोनमध्ये असलेल्या बटाटे विक्रेत्याचा सामान जप्त करीत असतांना अतिक्रमण पथकासोबत त्याचा वाद झाला. शाब्दीक चकामकीचे रुपांतर बाचाबाचीत होवून विक्रेत्याने अतिक्रमण कर्मचारी हरी सोनवणे यांना तराजू काट्याने मारहाण केल्याने त्यांना दुखापत झाली. दुसरीकडे विक्रेत्यांने कर्मचार्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला. या घटनेमुळे परिसरात जमाव झाल्याने तणाव निर्माण झाला होता. अखेर शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक सपकाळे यांच्यासह पथकाने घटनास्थळी पोहचत वाद मिटवला. याबाबत पोलिसात मात्र कुठलीही नोंद करण्यात आली नाही.