धुळे । शहरात औद्योगिक विकास खुंटला असून उद्योग व्यवसाय अल्पप्रमाणात असल्याने बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. भाजीपाला, छोटे-मोठे व्यवसाय करुन तरुण शहरातील प्रमुख रस्त्यांवर आपला उदरनिर्वाह भागवितात. हॉकर्स झोनची निर्मिती करताना तरुणांवर बेरोजगारीचे संकट ओढवणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी नगरसेवक अमोल मासुळे यांनी महासभेत केली. महापौर कल्पना महाले यांच्या अध्यक्षतेखाली महासभा घेण्यात आली. तब्बल अर्धातास उशीरा महासभा सुरु झाली. शहरातील वाढती रहदारी लक्षात घेता बाजारपेठ भागात हॉकर्स झोन, नो हॉकर्स झोन बाबत विषय महासभेत घेण्यात आला. त्यावेळी नगरसेवक अमोल मासुळे बोलत होते.
तातडीने तोडगा काढण्याची मागणी
अनेक वर्षापासून प्रभाग क्र. 26 मध्ये सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा यासाठी नाटेश्वर कॉलनीत नवीन जलकुंभाची निर्मिती करण्यात यावी, परंतु आजही प्रभागातील जनतेला सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होते. मनपा प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी नगरसेवक दीपक शेलार यांनी केली. स्थायी समितीच्या सदस्या फातमाबी शेख गुलाब यांच्या रिक्तपदी शहर विकास आघाडीचे अमिन पटेल यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. सुभाष नगरमधील प्रवेशद्वारास संत कन्हैय्यालाल म.सा., दुसर्याबाजूस सामाजिक कार्यकर्ते स्व. लक्ष्मण सोनू चौधरी यांचे नाव देण्याच्या विषयास मंजुरी देण्यात आली. देवपूर सर्व्हे नं. 25 जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट, देवपूर, धुळे या जागेतून जात असलेल्या रस्त्यास मंजूरी देण्यात आली आहे. महासभेत आयुक्त डॉ. सुधाकर देशमुख यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
तक्रारी करुनही कारवाई नाही
देवपुरातील जयहिंद कॉलनी, इंदिरा गार्डन, जयहिंद शाळा, जयहिंद महाविद्यालय या भागात नो हाकर्स झोनसाठी प्रशासनाला पत्रव्यवहार केला आहे. फेरीवाला पुनर्वसनासाठी उपसमितीने पर्यायी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी नगरसेविका प्रतिभा चौधरी यांनी यावेळी केली. मिल परिसरातील अजळकर नगर भागात सार्वजनिक ओपन प्लेसवर अतिक्रमणाविरोधात अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु कारवाई होत नसल्याचा निषेध महिला व बालकल्याण सभापती माधुरी अजळकर यांनी केला. तसेच लिलाबाई चाळ येथे गटारींवर अतिक्रमण केल्याने गटारींमध्ये घाण साचली आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लिलाबाई चाळीतून स्मशानभुमीकडे अंत्यविधीसाठी जाण्याकरीता अडथळा निर्माण होतो. रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात यावीत, अशी मागणी सौ. अजळकर यांनी यावेळी केली.
15 दिवसात व्हॉल्व दुरुस्ती
शहराला 4 ते 5 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. अनेकदा पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार याला कारणीभूत असल्याचा आरोप नगरसेवक अमोल मासुळे यांनी केला. प्रभाग 31 मध्ये चक्करबर्डी जलकुंभावरुन पाणीपुरवठा केला जातो. यादरम्यान, जवळपास 18 ते 20 व्हॉल्व लिकेज आहेत. त्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असते. 15 दिवसात सर्व व्हॉल्वची दुरुस्ती करुन करण्यात येईल, असे आश्वासन महापौर कल्पना महाले यांनी यावेळी दिले.