‘हॉकर्स झोन’वरून मनपाची माघार

0

मुंबई । मुंबई महापालिकेने मुंबईतील 85 हजारांहून अधिक फेरीवाल्यांचे बसण्याचे ठिकाण निश्‍चित करण्यासाठी काही ‘हॉकर्स झोन’ जाहीर केले होते. त्यात फेरीवाल्यांचे कट्टर विरोधक मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे निवासस्थान कृष्णकुंजच्या समोरील रस्त्याचा समावेश होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. अखेरीस मुंबईत फेरीवाला क्षेत्रांची जाहीर केलेली यादी त्वरित रद्द करण्याचे आदेश महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी दिले. परंतु, ही यादी जाहीर करताना लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेतले जात नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला होता. त्यावर उपाय म्हणून आता महापौरांच्या अध्यक्षतेखाली एक अपिलीय समिती गठित करण्यात येणार असून, त्यात नगरसेवक सदस्य असतील. या समितीला महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी चार दिवसांपूर्वी मंजुरी दिली असून लवकरच ही समिती नियुक्त करण्यासाठी महापौरांकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

यादी रद्द करणे शक्य नाही
मुंबईत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी फेरीवाला धोरणाची यादी जाहीर करून लोकांकडून हरकती व सूचना मागवल्या जात आहेत. ही यादी कायदेशीररीत्या प्रसिद्ध केल्यामुळे ही यादी रद्द करता येत नसल्याचे विभागाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. लोकांना जर फेरीवाला क्षेत्राबाबत हरकत असेल तर त्यांनी तक्रार नोंदवावी तसेच फेरीवाला क्षेत्र कुठे असावे? यासाठी पर्यायी रस्त्याचे नाव सुचवावे. या सर्व बाबींवर नगर विक्रेता समिती निर्णय घेईल. ही समिती न्यायालयाचा निर्णयही विचारात घेणार आहे.

फेरीवाला धोरणांची अंमलबजावणी करताना महापौर आणि नगरसेवकांना विचारात घेतले जाणार आहे. नगर विक्रेता समिती ही आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असली, तरी त्यावर एक अपिलीय समिती गठित केली जाणार आहे. महापौरांच्या अध्यक्षतेखाली 2 नगरसेवकांना या समितीच्या माध्यमातून फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीत सामावून घेतले जाईल. आधीची यादी रद्द करण्यापेक्षा लोकांनी व नगरसेवकांनी सूचना व हरकतीमध्ये आपला सहभाग नोंदवावा, अशी भूमिका महापालिकेच्या अधिकार्‍यांनी घेतली आहे. त्यामुळेही यावर पुढील कोणते धोरण ठरणार, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.