‘हॉकी इंडिया’ कडून सरदार सिंगची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

0

नवी दिल्ली । भारतीय क्रीडा क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणार्‍या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंगची शिफारस हॉकी इंडियाने केली आहे. सरदार सिंगने 2003-04 हंगामात पोलंड दौर्‍यावर भारतीय कनिष्ठ संघाकडून खेळताना आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

2006 मध्ये पाकिस्तानविरुद्ध वरिष्ठ संघातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी ओळखल्या जाणार्‍या सरदार सिंगची 2010 व 2011 मध्ये 18 सदस्यीय एफआयएच ऑल स्टार संघात निवड करण्यात आली होती. 2008 मध्ये त्याने सुलतान अझलन शाह चषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व करणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला होता. 2012 मध्ये त्याला अर्जुन तर 2015 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आघाडीच्या फळीतील एस.व्ही.सुनील, धरमवीर सिंग आणि दीपिका यांची अर्जुन तर आर.पी.सिंग व सुमरीत टेटे यांची ध्यानचंद पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. प्रशिक्षक प्रदीप सांगवान व रोमेश पठाणिया यांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस हॉकी इंडियाने केली आहे.