हॉकी वर्ल्ड लीगमध्ये भारत ब गटात

0

नवी दिल्ली । भुवनेश्‍वरमध्ये डिसेंबर महिन्यात होणार्‍या हॉकी वर्ल्ड लीग फायनलमध्ये यजमान भारताचा ब गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात भारतासह विश्‍वविजेत्या ऑस्ट्रेलियासह ऑलिमिप्क कांस्यपदक विजेत्या जर्मनी, युरो हॉकीनेशन्स विजेत्या इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाचा समावेश आहे. या स्पर्धेत भारतासमोर पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार असून हा सामना 1 डिसेंबरला खेळला जाईल.

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने भुवनेश्‍वरमध्ये 10 सप्टेंबरपर्यत खेळल्या जाणार्‍या या लीग फायनल स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली. स्पर्धेच्या अ गटात ऑलिम्पिक विजेता अर्जेटिना, युरोपियन विजेता नेदरलँड, ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता बेल्जियम आणि स्पेनचा समावेश आहे. जर्मनी आणि इंग्लंड यांच्यातील लढतीने स्पर्धेला सुरुवात होईल. त्याचदिवशी होणार्‍या दुसर्‍या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने असतील. भारताचा 2 डिसेंबरला इंग्लंड आणि चार डिसेंबरला जर्मनीविरुद्ध सामना होईल. साखळी लढतील सामने 1 ते 5 डिसेंबर दरम्यान खेळले जातील. तर 6 आणि 7 डिसेंबरला उपांत्यपूर्व फेरीचे सामने होतील. त्यानंतर पुढील दोन दिवस उपांत्य फेरी आणि क्लासिफेकशनचे सामने होतील. 10 डिसेंबर रोजी अंतिम आणि कांस्यपदकासाठीचा सामना खेळवला जाईल.