हॉकी विश्‍वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानचे तिकीट निश्‍चित

0

लुसाने । हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनलमध्ये सातवे स्थान मिळवत पाकिस्तानने पुढील वर्षी भारतात होणार्‍या विश्‍वचषक हॉकी स्पर्धेसाठी आपले स्थान निश्‍चित केले आहे. विश्‍वचषक हॉकी स्पर्धा पुढच्या वर्षी 28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबरदरम्यान भुवनेश्‍वर येथे होणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या क्रमवारीत 14 व्या स्थानावर असलेला पाकिस्तान लंडनमधील वर्ल्ड हॉकी लीगमध्ये सातव्या स्थानावर राहिला.

जर्मनी, इंग्लंड, नेदरलॅड आणि बेल्जियमने वर्ल्ड हॉकी लीगमध्ये पहिल्या पाच संघामध्ये स्थान मिळवून विश्‍वचषक स्पर्धेसाठी आपले तिकीट पक्के केले आहे.अ‍ॅमस्टरडॅममध्ये सुरू असलेल्या राबो बँक युरोहॉकी अजिंक्यपद स्पर्धेतील निकालांचाही पाकिस्तानला फायदा मिळाला. या स्पर्धेतील आघाडीच्या चार संघानी हॉकी वर्ल्ड लीगद्वारे यापूर्वीच विश्‍वचषक स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले होते. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या नियमांनुसार आंतरखंडीय पात्रता स्पर्धा जिंकणार्‍या देशाला विश्‍वचषक स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळतो. लंडन आणि जोहान्सबर्गमध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड हॉकी लीगमध्ये सातव्या स्थान मिळवणारा पाकिस्तानचा संघ आघाडीचा मानांकित संघ आहे. विश्‍वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला पाकिस्तान तेरावा संघ आहे. यजमान भारतासह अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, इंग्लंड, जर्मनी, आयर्लंड, मलेशिया, नेदरलँड, स्पेन आणि न्यूझीलंड आदी संघ याआधीच विश्‍वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.