हॉकी संघासाठी चार सल्लागारांची नियुक्ती

0

नवी दिल्ली । हॉकी संघाची कामगिरी अधिक चांगली व्हावी यासाठी सल्लागारांची नियुक्ती केली आहे. विश्वचषक व 2020 ची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये हॉकी इंडियाने खेळाडूंच्या तंदुरूस्तीची काळजी घेण्यासाठी स्कॉट कॉनवे, रॉबिन आर्केल, वेन लोम्बार्ड आणि डॅनिएल बॅरी या परदेशी सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे सल्लागार कनिष्ठ व वरिष्ठ पुरुष व महिला हॉकी संघातील खेळाडूंच्या तंदुरुस्तीच्या दृष्टिकोनातून काम करणार आहेत.

वरिष्ठ पुरुष संघाच्या नवीन वैज्ञानिक सल्लागार समितीचे प्रमुखपद ऑस्ट्रेलियाचे स्कॉट कोनवे यांच्याकडे असून,ते या पदाचा पदभार बेंगळूरु येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणात (साइ) सुरू असलेल्या राष्ट्रीय सराव शिबिरादरम्यान ते सूत्र स्वीकारणार आहेत.कनिष्ठ संघाच्या सल्लागारपदी दक्षिण आफ्रिकेच्या रॉबिन अँथोनी वेबस्टेर आर्केल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दक्षिण आफ्रिकेचेच वेन पॅट्रिक लोम्बार्ड हे वरिष्ठ महिला संघाचे, तर ऑस्ट्रेलियाचे डॅनिएल बॅरी हे कनिष्ठ महिला संघाचे सल्लागार म्हणून काम पाहतील. “स्कॉट कॉनवे, रॉबिन आर्केल, वेन लोम्बार्ड आणि डॅनिएल बॅरी यांची वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्ती करताना आम्हाला आनंद झाला आहे. जानेवारीत झालेल्या निवड समितीच्या बैठकीत त्यांच्या नावाला मंजुरी मिळाली. त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा खेळाडूंना नक्की फायदा होईल. टोकियो ऑलिम्पिक आणि विश्वचषक स्पर्धेत आमचे लक्ष्य गाठण्यासाठी खेळाडूंना याची फार मदत मिळेल,” हॉकी इंडियाचे सरचिटणीस मोह. मुश्ताक अहमद यांनी व्यक्त केली.