’हॉटसिटी’ भुसावळचा पारा 47.6 अंशांवर

0

तापमानाची उच्चांकी नोंद ; दुपारच्या वेळी निर्मनुष्य

भुसावळ- हॉटसिटी म्हणून जिल्ह्यात ओळख असलेल्या भुसावळात तापमानाचा पारा दिवसागणिक वाढतच आहे. सोमवारी शहराचे कमाल तापमान 47.6 अंशावर पोहोचल्याची नोंद केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयात करण्यात आली. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत असून अंगातून घामाच्या धारा वाहत असून उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. सकाळी 11 वाजेपासूनच उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असल्याने दुपारच्या वेळी शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे.

एप्रिल हिट तर ‘मे’ मध्ये होणार काय?
भुसावळ शहरात सरासरी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तापमानात वाढ होते. यंदा मात्र मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच तापमानात वाढ सातत्याने होताना दिसून आली. एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासून तापमानाचा पारा 42 अंशावर पारा पोहोचला होता तर वातावरणात केवळ 37 टक्के आर्द्रता असल्याने उकाड्याचे प्रमाण वाढले होते. सोमवारी आरपीडी रोड, सराफ बाजार, मॉडर्न रोड, कपडा मार्केट, अप्सरा चौक आदी भागातील रस्तेही दुपारी ओस होते. दरम्यान, एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत तापमानाचा पारा थेट 48 अंशापर्यंत भिडल्याने मे महिन्यात कसे होणार? या एका प्रश्‍नाने शहरवासीयांच्या मनात घर केले आहे.