हॉटेलवाल्यांनी ओढ्यात टाकल्या मेलेल्या कोंबड्या

0

तळेगाव ढमढेरे येथील ग्रामपंचायत हद्दीमधील चोविसावा मैल व लांडेवस्तीतील प्रकार

शिक्रापूर । तळेगाव ढमढेरे गावच्या हद्दीतील पुणे-नगर रस्त्याजवळ असलेल्या चोविसावा मैल व लांडेवस्ती येथे असलेल्या ओढ्यात अनेक पोल्ट्री व्यावसायिक मेलेल्या कोंबड्या अणून टाकत असल्याने येथे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तळेगाव ढमढेरे येथील ग्रामपंचायत हद्दीमध्ये चोविसावा मैल व लांडेवस्ती असून या वस्तीत असलेल्या ओढ्याचे नुकतेच खोलीकरण करण्यात आले आहे. येथील पाण्याचा उपयोग नागरिकांना पिण्यासाठी व शेतीसाठी केला जातो; परंतु येथे पुणे-नगर रस्त्यावरील हॉटेल व्यावसायिक त्यांचा कचरा या ओढ्यात आणून टाकत असतात तसेच या रस्त्याने जाणारी वाहने देखील मृत कोंबड्या, जनावरे, विविध प्रकारचा कचरा देखील या ओढ्यामध्ये राजरोसपणे आणून टाकतात त्यामुळे लांडेवस्ती येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या दुषित झाले आहे. ओढ्याचे विद्रुपीकरण झाले असून येथे कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर येथे टाकल्या जाणार्‍या कचर्‍यामुळे येथील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कचर्‍याची विल्हेवाट लावावी आणि कचरा टाकणार्‍यांवर कारवाई करावी, अन्यथा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.

या ठिकाणी साफसफाई करून यापुढे कचरा टाकला जाणार नाही याची दक्षता घेणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी विजय रोकडे यांनी सांगितले. हॉटेल व्यावसायिकांवर कोणाच्याही निर्बध नसल्याने अशा पद्धतीने राजरोसपणे पिण्याचे पाणी दूषित केले जात आहे. याविषयी नागरिकांनी संताप व्यक्त केला.