नवी दिल्ली : आपला देश गरीब असल्याचे प्रवचन आपण नेहमी ऐकत असतो. पण कुठल्याही महागड्या हॉटेलात गेल्यास तिथे अर्धवट टाकलेले अन्नपदार्थ दिसतात. हे अधिकचे ग्राहकाने टाकून दिलेले पदार्थ शेवटी कचर्यात फ़ेकले जातात. अशा अन्न नासाडीला पायबंद घालण्याचा विचार केंद्रीय पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी केला असून, त्यासाठी माहिती गोळा केली जात आहे. शक्यतो हॉटेल व्यावसायिकांनीच त्यात पुढाकार घ्यावा असा मंत्र्यांचा आग्रह आहे.
बहुतेक महागड्या हॉटेलमध्ये ठराविक आकारात व वजनात अन्नपदार्थ विकले जात असतात. जितके मागवले त्याची किंमत वसुल केली जाते. पण ग्राहकाने मागवले तितके खाल्ले नाही, तर तो पदार्थ कचर्यात फ़ेकावा लागतो. त्यामुळे अन्नाची मोठी नासाडी होते. देशात कोट्यवधी लोक उपासमारीचे बळी होत असताना, पैशाचे प्रदर्शन मांडून अशी नासाडी होऊ नये, म्हणून उपाय योजण्याचा पासवान यांचा विचार आहे. त्यात ग्राहकाने आवश्यक तितकेच मागवावे अशी भूमिका घेण्यात आली आहे. हॉटेलने अमूकच आकार वा वजनाचा पदार्थ मागवण्याची सक्ती करू नये, अशी त्यातली अपेक्षा आहे.
बहुतेक नावाजलेल्या वा ख्यातनाम हॉटेलात मोठ्या किंमती आकारल्या जातात आणि त्यासाठी अधिक आकाराचे अन्नही गळी मारले जात असते. त्यातून ही नासाडी चालते, हा आक्षेप आहे. त्यातून सुटका करून घेण्य़ासाठी खाल्ले जाईल इतकेच अन्न ग्राहकाने मागवावे, अशी सोय हॉटेलने करावी असा पासवान यांचा आग्रह आहे. सक्तीने अधिकचे अन्न पैशासाठी ग्राहकाच्या गळी मारले जाऊ नये आणि त्यासाठीच्या सुधारणा व आखणी व्यावसायिकांनीच करावी. त्यात सरकारला हस्तक्षेप करायची वेळ आणू नये असेही पासवान म्हणाले आहेत.