मुंबई । कमला मिल येथील अग्नितांडवाच्या घटनेनंतर पालिकेने आता कोणत्याही हॉटेल्स, रेस्टॉरंटच्या गच्चीवरील भागात शेड उभारण्यास कायमची बंदी आणली आहे. पावसाळ्यातच केवळ 1 मीटर उंचीची शेड पालिकेच्या परवानगीने बांधता येणार आहे. पावसाळ्याव्यतिरिक्त कोणीही हॉटेल्स, रेस्टॉरंटच्या गच्चीवरील भागात शेड उभारल्यास त्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी संबंधित विभागाच्या खातेप्रमुखांना दिले आहेत. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व खातेप्रमुखांची मासिक आढावा बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्हाड, उपायुक्त रमेश पवार यांच्यासह महापालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी वरीलप्रमाणे कारवाईचे आदेश संबंधित खाते प्रमुखांना दिले. त्यामुळे आता मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंटच्या गच्चीवर शेड उभारणार्या मालकांचे धाबे दणाणले आहेत.
ज्वलनशील पदार्थ आढळल्यास नोटीस व कारवाई
हॉटेल्समध्ये लाकडी जिने, भिंतीवरील लाकडी आच्छादन किंवा लाकडी ’पार्टिशन’ यांसारख्या ज्वलनशील बाबी अग्निसुरक्षेच्या दृष्टीने घातक ठरू शकतात. हे लक्षात घेऊन, ज्या ठिकाणी अशा बाबी आढळून येतील त्याबाबत तत्काळ नोटीस देऊन त्यावर कारवाई करावी, असे आदेशही आयुक्त यांनी दिले आहेत. हॉटेल्समधील जिन्याची रुंदी ही नियमानुसार किमान 1.5 मीटर असणे बंधनकारक आहे. ज्याठिकाणी ही रुंदी कमी आढळून येईल, त्याबाबतदेखील नियमांनुसार तत्काळ कार्यवाही करावी, असे आयुक्तांनी म्हटले आहे.
बांबू, प्लास्टिकच्या शेडमुळे दुर्घटना
लोअर परळ, कमला मिल येथील मोझोस रेस्टॉरंट व वन अबव्ह रेस्टॉरंटच्या गच्चीवरील भागातील जागेत हॉटेल व्यवसाय सुरू असतानाच तेथे 29 डिसेंबर 2017 रोजी हुक्कयामुळे आगीची दुर्घटना घडली व त्यात 14 तरुणांचा नाहक बळी गेला. त्यानंतर जागृत झालेल्या महापालिकेने मुंबईतील सर्व हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, क्लब, जिमखाने आदी ठिकाणी गच्चीवर करण्यात आलेल्या अतिक्रमण व हॉटेल व्यवसायावर कारवाईचा बडगा उगारणे सुरू केले. सध्या याबाबतची कारवाई पालिकेकडून सुरू आहे. वास्तविक, या कमला मिलमधील या रेस्टोरंटच्या गच्चीवरील भागात बेकायदा बांबू व प्लास्टिक कागदाचा वापर करून उभारलेल्या पावसाळी शेडमुळे ही आग भडकली होती. ही बाब लक्षात घेऊनच पालिकेने आता हॉटेल्स, रेस्टॉरंटच्या गच्चीवरील भागात कोणत्याही प्रकारची शेड उभारण्यास मनाई केली आहे.
पालिका आयुक्तांनी शेड तोडण्याचे दिले आदेश
पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मते, अनेक हॉटेल्सच्या गच्चीवर पावसाळ्याच्या काळात ’शेड’ उभारले जाते. हे शेड अग्निसुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरु शकते. ही बाब लक्षात घेऊन यापुढे उपहारगृहांच्या गच्चीवर कोणत्याही प्रकारचे शेड उभारण्यास परवानगी देऊ नये. केवळ पावसाळ्याच्या काळातच हॉटेल्सच्या गच्चीवर केवळ एक मीटर उंचीची ’शेड’ उभारण्याची परवानगी देण्यात यावी, असे आयुक्त यांनी म्हटले आहे. तसेच ज्या ठिकाणी पालिकेच्या परवानगीशिवाय ’शेड’ आढळून येतील, ते तत्काळ तोडावेत, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले.