हॉटेल आमंत्रणमधील जप्त केलेला ‘तो’ तांदूळ निघाला प्रमाणित

0

प्लास्टिक अंडी, तांदूळ व फ्लॉवर अस्तित्वातच नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हा व्यापारी महामंडळाचे आवाहन

जळगाव । येथील विसनजीनगरमधील हॉटेल आमंत्रण मध्ये दि. १८ ऑगस्ट २०१७ रोजी काही ग्राहकांनी भात देण्याची मागणी केली होती. भाताची डिश समोर आल्यानंतर त्या ग्राहकांनी भाताचे गोळे तयार करुन ते चेंडूप्रमाणे टेबलवर आदळत असल्याचे दाखवून भातासाठी प्लास्टिक तांदूळ वापरल्याचा दावा केला होता. या आक्षेप घेतलेल्या तांदुळाचे नमुने तपासणीसाठी नमुना अन्न विश्लेषक प्रयोगशाळा (पुणे) यांना पाठविण्यात आले होते. त्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून तो तांदूळ खाण्यालायक प्रमाणित असून त्यात कोणतेही प्लास्टिक कण आढळलेले नाहीत असे स्पष्ट म्हटले आहे.

विश्वासाची पिढीजात परंपरा
जळगावात प्लास्टिक तांदूळ आढळला या अफवेचे खंडन सर्व प्रथम जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाने केले होते. आता तांदुळाचा नमुना खाण्यालायक व प्रमाणित आढळला आहे. ही बाब पाहून जळगावमधील व्यापारी वर्गावर असलेला ग्राहकांचा विश्वास कायम राहण्यास मदत होईल. जनतेने अफवांपासून दूर राहावे असे आवाहन जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा व सरचिटणीस ललित बरडीया यांनी केले आहे.

पुणे येथील प्रयोगशाळेत झाली अंतिम तपासणी
या संदर्भात पदावधित अधिकारी तथा अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त मिलिंद दा. शाह यांनी सविस्तर खुलासा प्रसिध्दीस दिला असून जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाने या पत्रकावरुन ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचा सविस्तर खुलासा असा – हॉटेल आमंत्रणमधील भात संदर्भात तक्रार आल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून तांदुळाचे नमुने घेतले होते. हे नमुने पुणे येथील अन्न भेसळ ओळखणार्‍या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तपासणीअंती तो तांदूळ धान्य म्हणून प्रमाणित व खाण्यायोग्य आढळल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या संपूर्ण कारवाईत अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त मिलिंद दा. शाह यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. श्री. शाह यांनी या अहवालास प्रसिध्दी देताना आवाहन केले आहे की, सोशल मीडिया जसे व्हाट्सअप, फेसबूकवर फोटो किंवा क्लिप टाकून प्रचार केला जातो की, चीनमधून प्लास्टिक तांदूळ, अंडी, फ्लॉवर, साखर याची भारतीय बाजारात आवक झाली आहे. अशा तक्रारी लक्षात घेवून अन्न व भेसळ प्रतिबंधक प्रशासनाने संपूर्ण भारतात संबंधित वस्तुंचे हजारो नमुने घेतले. त्याची तपासणी केली. त्यात कुठेही प्लास्टिक तांदूळ, अंडे, फ्लॉवर अथवा साखर आढळली नाही. जनतेने सोशल मीडियावरील त्या क्लिपवर विश्वास ठेवू नये.