जळगाव । महामार्गावरील कस्तुरी हॉटेलजवळ समोरून येणार्या रिक्षाला कट मारण्याच्या प्रयत्नात प्रवासी रिक्षा उलटून तीन जण गंभीर जमखी झाल्याची घटना सोमवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जखमी प्रवाश्याने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात रिक्षाचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिसरातील नागरिकांनी घेतली मदतीसाठी धाव
सुप्रिम कॉलनी परिसरातील खुबचंद साहित्य नगर येथील रहिवासी सोपान पाटील (वय-54) हे सोमवारी सकाळी कृषि उत्पन्न बाजार समिती येथून भाजीपाला घेतल्यानंतर घरी परतण्यासाठी एमएच.19.व्ही.5301 ह्या रिक्षात बसले. यावेळी आणखी प्रवासी बसलेले होते. दरम्यान, सकाळी 9 वाजेच्या सुमारास रिक्षाचालक हा महामार्गावरील औरंगाबाद रस्त्यावरून भरधाव वेगात रिक्षा पळवत असतांना हॉटेल कस्तुरीजवळ आल्यानंतर समोरून येणार्या रिक्षाला कट मारण्याचा प्रयत्न केला. यात रिक्षा पलटी होवून काही अंतरापर्यंत फरफटत गेली. या अपघातामुळे रिक्षातील प्रवासी सोपान पाटील व अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. तर रिक्षाचेही नुकसान झाले. परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेत रिक्षातील प्रवाश्यांना बाहेर काढून उपचारार्थ रूग्णालयात हलविले. यातच एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भेट दिली. यानंतर रूग्णालयात जावून जखमी सोपान पाटील यांचे जबाब नोदवून घेत भरधाव वेगात रिक्षा पळवून अपघात घडवून आणणार्या एमएच.19.व्ही.5301 वरील चालकाविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पूढील तपास राजाराम पाटील हे करीत आहेत.