जळगाव। भुसावळ महामार्गावरील हॉटेल गारवासमोर खोल साईड पट्टीमुळे दुचाकीचा तोल गेल्याने मागे बसलेली महिला महामार्गावर पडून ट्रकखाली चिरडली गेल्याची घटना शनिवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली.
या अपघातात महिलेचा पती व मुलगा किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, या अपघातात महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. पुनम प्रशांत जैन (वय-24) असे मयत महिलेचे नाव असून दुपारी महिलेच्या मृतदेहावर शवविच्छेदन
करण्यात आले.
जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी
रामेश्वर कॉलनी येथील रहिवासी प्रशांत सतिष जैन हे बांभोरी येथील जैन इरिगेशन येथे कामाला आहेत. प्रशांत जैन हे मुळचे रावेर तालुक्यातील बलवाडी येथील असल्याने ते पत्नी पुनम व मुलगा श्रेयस यांच्यासोबत शनिवारी दुचाकी (क्रं. एमएच.19.सी.एन.1476) ने बलवाडी येथे पुजेच्या कार्यक्रमाला गेले होते. दुपारी पुजेचा कार्यक्रम आटोपून प्रशांत जैन हे पत्नी व मुलासोबत दुचाकीने जळगावसाठी निघाले. दुपारी 2 वाजता नशिराबादजवळील गोदावरी हॉस्पीटलनजीक असलेल्या हॉटेल गारवासमोरून जात असतांना प्रशांत यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला आली आणि साईड पट्टीवरून महामार्गावर दुचाकी चढवतांना त्यांच्या दुचाकीचा तोल गेला. यात दुचाकी घसरून पडल्याने प्रशांत व त्यांचा मुलगा हे रस्त्याच्याकडेला फेकले गेले. परंतू त्यांच्या पत्नी पुनम ह्या महामार्गावर पडल्याने मागून भरधाव वेगाने येणार्या ट्रक (क्रं.एमएच.43.7740) ने त्यांना चिरडले. यात पुनम यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पुनम यांचा मृतदेह मालवाहू गाडीतून नागरिकांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात नेला. वैद्यकीय अधिकार्यांनी महिलेला तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. यावेळी नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात गाठत आक्रोश केला. तर जैन येथील कर्मचार्यांची रूग्णालयात गर्दी केली होती. या अपघातात प्रशांत व त्यांचा दहा महिन्याचा मुलगा श्रेयस यांना किरकोळ मार लागला आहे.