जळगाव : एकीकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून एमआयडीसी पोलीस स्टेशन शेजारीच हॉटेल असतांनाही पैशांच्या लोभासाठी विना परवानगी वाद्य वाजंत्रीसह पार्टीचा कार्यक्रम करणार्या हॉटेल प्रेसिडंटचे मालक मनोज अडवानी, मॅनेजर दिनेश मधुकर दुटे वय 43 रा. वाटीकाश्रम खोटेनगर, यांच्यासह वाद्य वाजविणार्या किशोर नागराज पाटील रा भिकमचंद जैन नगर या तीन जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 22 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास हॉटेल प्रेसिडंटच्या आवारात लोकांची गर्दी जमवून, विना माक्स तसेच सोशल डिस्टन्सिंग याप्रमाणे शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा
प्रकार घडला.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
याबाबत सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल मोरे यांनी हॉटेल मॅनेजर दिनेक दुटे ला कार्यक्रमाबाबत तसेच वाद्य वाजविण्याबाबत परवानगी आहे का ? याबाबत विचारले असता, त्याने पूल पार्टीचा कार्यक्रम असून परवानगी घेतली नसल्याचे साांगितले.परवानगी न घेता पार्टीचा कार्यक्रम, गर्दी करणे, सामाजिक अंतर न पाळणे, मास्क न वापरणे याप्रमाणे जिल्हाधिकार्यांच्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर असलेल्या आदेशाचे उल्लंघन झाल्याने याप्रकरणी पोलीस कर्मचारी किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरुन हॉटेल प्रेसिडंटचे मालक मनोज आडवानी, मॅनेजर दिनेश कुटे व वाद्य वाजविणारा तरुण किशोर पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या प्रकाराचे पोलिसांनी व्हिडीओ चित्रणही केले आहे.
वाद्य, वाजंत्री अन् गर्दी
22 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यालगत असलेल्या हॉटेल प्रेसिडंट याठिकाणी मोठ मोठ्याने वाद्य वाजविण्याचा आवाज येत होता. यावेळी ठाणे अंमलदार जितेंद्र राठोड, सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल मोरे, पोलीस उपनिरिक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरिक्षक विशाल सोनवणे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलीस कॉन्स्टेबल किशोर पाटील यांनी हॉटेल प्रेसिडंट गाठले. याठिकाणी गर्दी लोक उभे होते, तसेच सोशल डिस्टन्सिंगसह काही लोकांच्या तोंडाला यावेळी मास्क नसल्याचे दिसून आले.
शासनाकडून कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमिवर प्रशासनाकडून विविध उपाययोजनांचा अवलंब करण्यात येत आहे. 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरु होणार होत्या. मात्र खबरदारी म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे पैशांच्या लोभासाठी हॉटेल व्यावसायिक विना परवानगी कार्यक्रम राबवित असल्याचा प्रत्यया या घटनेवरुन आला आहे. दरम्यान एमआयडीसी पोलिसांच्या कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.