हॉटेल मालकाला मारहाणप्रकरणी एकाला शिक्षा

0

जळगाव। शहरातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या क्रांती चौकातील हॉटेल विलास उपहार गृहाच्या जागेच्या वादातून तिघांनी मिळून हॉटेल मालकाला लाकडी काठीने व लाथाबुक्क्यांनी मारून गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी शहर पोलिस स्थानकात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला जळगाव न्यायालयात सुरू असतांना आज मुख्य आरोपीला एक वर्ष सहा महिन्याची शिक्षा, 4 हजार रू. दंड, दंड न भरल्यास 58 दिवसाची साधी कैद तर यातील दोघा संशयितांना दोषी ठरवून त्यांच्याकडून बॉण्ड पेपरवर लिहून घेवून समज देत त्यांना मुक्त केले आहे. अशी शिक्षा आज न्या. एम. एम. चौधरी यांनी शिक्षा ठोठावली आहे.

शिवाजीनगर भागातील क्रांती चौकात असलेल्या हॉटेल विलास चहा-नास्ताची हॉटेल होती. या ठिकाणी देविदास गोविंदा शेटे या हॉटेल मालकाला हॉटेलमध्ये येवून 6 एप्रिल 2010 रोजी हे दुकान मी विकत घेतले आहे. तू ही जागा लवकरच खाली कर अशी धमकी यावेळी दिली. तर देविदास शेटे यांनी ते दुकान खाली न केल्याने राजेंद्र सुकलाल ठाकरे यांच्यासह शैलेश धनराज सोनवणे, निलेश राजेंद्र ठाकरे (तिघे रा. शिवाजीनगर) या तिघांनी देविदास यांच्या हातावर लाकडी दांड्याने मारहाण करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत गंभीर जखमी केल्याने शहर पोलिस स्थानकात तिघां विरूध्द कलम 452, 448, 423, 324, 506 (34) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेवून न्यायालयात हजर करून न्यायालयाने त्यांचा जामिन मंजूर केला होता. तेव्हा पासून ते जामिनावर असतांना हा खटला जळगाव न्यायालयात सुरू होता.

6 साक्षीदार तपासले
6 मार्च रोजी दाखल असलेल्या गुन्ह्यातील तिघंही आरोपी विरूध्द खटला सुरू असतांना यात न्यायालयाने 6 साक्षीदार तपासून न्या. चौधरी यांनी आरोपी राजेंद्र सुकलाल ठाकरे याला 1 वर्ष 6 महिन्याची शिक्षा 4 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 58 दिवसांची साधी वैैद अशी शिक्षा आज सुनावली. मारहाणीत मदत करणारे निलेश राजेंद्र राठोड, शैलेश धनराज सोनवणे यांना देखील न्यायालयाने दोषी ठरविले. मात्र त्यांची चांगली वर्तवणूक पाहता त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतले. या हमीपत्रावर यानंतर आम्ही असे कुठलेही कृत्य करणार नाही. तर आमची नेहमी चांगलीच वर्तणूक राहील असे बॉण्ड पेपरवर लिहून दिल्यानंतर दोघांना समज देवून न्यायालयाने सोडून देण्याचे आदेश दिले आहेत.