‘हॉटेल वेस्ट’साठी स्वतंत्र यंत्रणा

0

पिंपरी-चिंचवड : शहरातील हॉटेल्सची संख्या वाढत असल्याने हॉटेलमध्ये निर्माण होणार्‍या ‘वेस्ट’चे प्रमाणही गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत तिप्पटीने वाढले आहे. हॉटेल्सची संख्या वाढल्याने हॉटेलमधील ‘वेस्ट फुड’ संकलनासाठी महापालिकेची यंत्रणा कुचकामी ठरत आहे. सरसकट हॉटेल वेस्ट संकलित करण्यासाठी बायोगॅस निर्मिती प्रकल्प राबविणार्‍या ठेकेदारामार्फत स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. दिवसाला 50 टन वेस्ट संकलनाचे लक्ष्य महापालिकेने समोर ठेवले आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

तळेगावच्या संस्थेची नेमणूक
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मोशी कचरा डेपोमध्ये दिवसाला सुमारे 30 ते 35 टन हॉटेल वेस्टचे डंपिंग करण्यात येते. यामध्ये शहरातील प्रमुख 517 हॉटेल आणि कॅन्टीनमधून 30 टन तर औद्योगिक कंपन्यांच्या कॅन्टीनमधील 25 टनाहून अधिक कचर्‍याचा समावेश आहे. हा कचरा केवळ महापालिकेने परवाना दिलेल्या हॉटेल, कॅन्टीनमधून जमा केला जातो. स्वतंत्रपणे जमा केल्या जाणार्‍या या वेस्ट फूडसाठी जादा तसेच वजनावर शुल्क आकारले जाते. सध्या पंचतारांकित हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी, चायनीज स्टॉल, खाद्य पदार्थांच्या हातगाड्या, बेकरी आदी हजारो विक्रेत्यांकडील वेस्ट फूड संकलित केले जाते. या कचर्‍याचे विघटन करण्यासाठी महापालिकेने गांढूळ खत निर्मितीसारखा प्रकल्प सुरू केला. मात्र, यामध्ये हॉटेल वेस्टचे सहजासहजी विघटन होत नाही. त्यामुळे हॉटेल वेस्टपासून आता बायोगॅस निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी तळेगाव येथील एका संस्थेची हॉटेल वेस्ट संकलन करून बायोगॅस निर्मितीसाठी नेमणूक करण्यात आली आहे. हे काम सुरू होण्यास तीन ते चार महिन्यांचा अवधी लागणार आहे.

नोंदणीचे व्यावसायिकांना आवाहन
औद्योगिक फूड वेस्टचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. 2006-07 मध्ये दिवसाला औद्योगिक फूड वेस्ट 495 टन होते. तर, हॉटेल, कॅन्टीनमधून जमा होणार्‍या कचर्‍याचे प्रमाण 3 हजार 718 टन होते. 2011-12 मध्ये वेस्ट फुड आणि हॉटेल, कॅन्टीनमधून वेस्ट फुडचे प्रमाण 11 हजार टनावर पोहोचले. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत हॉटेल फुड आणि औद्योगिक फूड वेस्टच्या प्रमाणात तिप्पटीने वाढ झाली आहे. 2015-16 मध्ये दिवसाला 30 टन हॉटेल वेस्ट फूड संकलित होत होते. आज रोजी दिवसाला 35 ते 40 टन वेस्ट फुड संकलित होते. परंतु, बहुतांश हॉटेलची नोंदणीच नसल्यामुळे त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी हॉटेल व्यावसायिकांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेची यंत्रणा अपुरी
वेस्ट फूड संकलनासाठी महापालिकेची यंत्रणा तोकडी पडत आहे. त्यामुळे कचर्‍याचे वाढते प्रमाण धोकादायक ठरत आहे. महापालिकेने खासगी सहभागातून बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नोबेल एक्सचेंज संस्थेसोबत वीस वर्षांचा करार करण्यात येणार आहे. हॉटेलमधील वेस्ट फूड गोळा करून मोशी कचरा डेपोपर्यंत वाहतुकीचे कामही ठेकेदारामार्फत होणार आहे. महापालिकेकडे वेस्ट फूड संकलनासाठी पुरेशी यंत्रणाच उपलब्ध नसल्यामुळे सर्व हॉटेलमधील वेस्ट फूड पूर्णपणे संकलित होत नाही. ठेकेदार संस्थेमार्फत वेस्ट फूड संकलनासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्यानंतर आरोग्य विभागाची अपुरी यंत्रणा काढून घेण्यात येणार आहे.