हॉटेल व्यावसायिकांचा धंदा २५ टक्क्यांनी घटला

0
पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातील हॉटेल्स, रेस्तराँ सज्ज झाली खरी परंतु, पुणेकरांनी घरी बसूनच सेलिब्रेशन करणे पसंत केल्याने हॉटेल्स, रेस्तराँचा धंदा २५ टक्क्यांनी घटला. ऑनलाइन ऑर्डर देण्याची व्यवस्था जिथे होती तिथे प्रतिसाद मिळाला. पण गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी केलेली सजावट वाया गेली.
मद्यपी वाहनचालकांवर परवाने रद्द करण्याची कारवाई, दुचाकी वाहनचालकांना हेल्मेटसक्ती आणि अन्य पोलीसी कारवायांचे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्याच्या अंमलबजावणीसाठी मोठा पोलीस फोर्स तैनात करण्यात आला होता. त्यामुळे लोकांनी बाहेर जाणे टाळले तसेच घरातील तरुण वर्गालाही बाहेर जाण्यापासून पालकांनी मज्जाव केला. त्याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर होऊन हॉटेलमध्ये येऊन सेलिब्रेशन करण्याचे प्रमाण २५ टक्क्यांनी घटल्याची माहिती शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी दिली.
हॉटेलमधील खाद्यपदार्थांसाठी ऑनलाइन ऑर्डरचे प्रमाण दुप्पटीने वाढले. ज्या हॉटेल व्यावसायिकांनी ऑनलाइन बुकींगद्वारे घरपोच सेवा देवू केली होती त्यांची रात्री १० ते १२ यावेळात प्रचंड तारांबळ उडाली. मागण्यांचा रेटा वाढल्याने अनेक ऑर्डर्स पूर्ण करता आल्या नाहीत त्यामुळे धंद्यावर परिणाम झालाच, ग्राहकांचाही हिरेमोड झाला.