हॉटेल व्यावसायिकांनो दर कमी करा

0

पुणे । केंद्र शासनाने जीएसटी परिषदेच्या शिफारशीनुसार उपहारगृहावरील जीएसटी कर अठरा टक्क्यांवरून पाच टक्के केला असून त्याची अंमलबजावणी सर्वत्र झाली आहे. या कमी करण्यात आलेल्या जीएसटी कराचा फायदा ग्राहकांना व्हावा, अशी सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री व पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली. उपहारागृहासाठी जीएसटी करामध्ये झालेल्या बदलाच्या पार्श्‍वभूमीवर हॉटेल व्यावसायीक संघटना, व्यवसाय कर अधिकारी यांची बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली व्हिव्हीआयपी विश्रामगृहात पार पडली त्यावेळी ते बोलत होते.

कमी करण्यात आलेल्या जीएसटी कराचा फायदा ग्राहकांना व्हावा यासाठी हॉटेल व्यावसायीक संघटनेने पुढाकार घ्यावा. उपहारगृहाचा जीएसटी नोंदणी क्रमांक देयकावर स्पष्टपणे नमूद करावा, उपहारगृहाच्या दर्शनी भागात तो प्रदर्शित करण्यात यावा. दरातील फेररचनेमुळे उपहारगृहातील पदार्थांचे दर कमी होणे अपेक्षीत आहे. याबद्दल ग्राहकांना येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाईन सुरू करावी, अशी सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केली.बैठकीला हॉटेल व्यावसायीक संघटनेचे पदाधिकारी, व्यवसाय कर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.