हॉटेल व्यावसायिकांवर कारवाईची मागणी

0

सणसवाडी । पुणे-नगर रोडवर सणसवाडी येथे औद्योगिक क्षेत्र असल्याने या भागात हॉटेल व खानावळीचे उद्योग व्यवसाय चालतात. परंतु काही हॉटेलमधील नाष्टा सेंटरमध्ये नागरिकांना शुद्ध पाण्याऐवजी विहीर, टँकर, व बोअरचे पाणी पिण्यास दिले जाते. माफक दरापेक्षा जादा दर आकारून ग्राहकांना वेठीस धरले जात आहे. गुणवत्ता व परवाना याबाबत आरोग्य विभागाने तपासणी करून हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते अशोक तुकाराम दरेकर यांनी शिरूर तालुका आरोग्य विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दरेकर यांनी सणसवाडी येथील दवाखान्यांची पाहणी केली. त्यावेळी अनेक जण अशुद्ध पाण्यामुळे होणार्‍या साथीच्या आजाराने ग्रस्त असल्याचे आढळून आले. हॉटेल व नाश्ता सेंटर मध्ये टँकरचे, विहिरीचे, तसेच बोअरवेलचे पाणी पिण्यास ठेवतात. बाटली बंद पाणी मात्र 30 रुपये किंमतीने अधिक प्रमाणात विकले जाते. या भागात कामगार जेवण, नाष्टा करतात. त्यांना बाटलीबंद पाणी घेणे परवडत नाही. प्रदूषित पाणी पिण्यास ठेवणार्‍या खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर तसेच हॉटेल मालकांवर कारवाई करावी, असे दरेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.