भुसावळ- मध्य रेल्वेच्या अप मार्गावरील नांदगाव ते पिंपरखेड स्थानकादरम्यान 02062 अप बरौनी – लोकमान्य टिळक टर्मिनस समर हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेसच्या ब्रेकर कोचच्या चाकाला तडा गेल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान घडली. तब्बल दोन तास 50 मिनिटांनी अपघातग्रस्त कोच बाजूला करुन गाडी मुंबईकडे रवाना झाली. यामुळे विभागातून अप लाईनवर धावणार्या नऊ एक्सप्रेस गाड्या तीन तास विलंबाने धावल्या. बरौनीकडून लोकमान्य टिळक टर्मिनलकडे जाणारी 02062 अप समर हॉलीडे स्पेशल एक्सप्रेसच्या मागील जनरेटर, सामान व ब्रेकरच्या कोचचे चाक नांदगाव ते पिंपरखेड स्थानकादरम्यान अचानक तुटले. ही बाब लोको पायलटच्या लक्षात आल्याने गाडी थांबवून पाहणी करण्यात आली. हा प्रकार निदर्शनास आल्याने तत्काळ भुसावळ विभागीय कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. सकाळी साडेआठ वाजता घडलेल्या या प्रकारामुळे रेल्वे प्रशासन हादलले. यापूर्वी अशा घटना अपवादाने घडल्या असल्याने या घटनेबाबत प्रशासनाने गांभिर्याने दखल घेतली.
तीन तासानंतर हॉलिडे रवाना
सकाळी साडेआठ ते दहा वाजून 50 वाजेदरम्यान अपघातग्रस्त कोच बाजूला सारला गेला. नांदगाव यार्डात हा कोच ठेवून एक्सप्रेस लोकमान्य टर्मिनस स्थानकाकडे रवाना झाली. या घटनेमुळे तब्बल तीन तास अप लाईनवरील वाहतूक विस्कळीत झाली. अप मार्गावरील महानगरी, सचखंड, गोवा, झेलम, दुरांतो, पटना सुपर, छपरा सुपर फास्ट, अलाहाबाद मुंबई हॉलिडे स्पेशल, मंडूआहिड पुणे हॉलीडे स्पेशल या गाड्यांना तीन तास विलंब झाला. यातील 11060 अप छपरा सुपरफास्ट एक्सप्रेस, 12222 अप दुरंतो एक्सप्रेस या दोन्ही गाड्या भुसावळ स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्या. तसेच भुसावळ यार्डात 04115 अप अलाहाबाद मुंबई हॉलीडे स्पेशल तसेच 01498 मंडूआहिड पुणे हॉलीडे स्पेशल एक्सप्रेस थांबविण्यात आल्या होत्या. तर अन्य गाड्या जळगाव, चाळीसगाव आदी स्थानकांवर थांबविण्यात आल्या या सर्व गाड्या आपल्या नियोजीत वेळेपेक्षा तब्बल तीन तास उशिराने धावल्या. यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. फलाटावर गाडी थांबून असल्याने नेमके कारणही प्रवाशांना सांगितले जात नव्हते. अर्धा तासाने अपघाताची माहिती मिळाल्यानंतर प्रवाशांचा संताप शांत झाला. यामुळे स्थानकावरील फलाट क्रमांक तीन व चारवर मोठी गर्दी झाली होती.