भुसावळ- 02009 डाऊन सीएसटी-गोरखपूर एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण डब्यात 30 वर्षीय प्रवाशाचा शुक्रवादी दुपारी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रवाशाचा रेल्वे प्रवासात हृदयविकाराने मृत्यू झाल्याची शक्यता आहे. अनोळखी प्रवाशाच्या अंगात क्रीम रंगाचा शर्ट, भुरकट रंगाची जीन्स पँट, रंग काळा-सावळा, बांधा सडपातळ, मिशी-दाढी वाढलेली व काळी, डोक्याचे केस काळे व नाक सरळ असे वर्णन आहे. अनोळखी प्रवासी सीएसटी येथून बसल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली व तो मयत झाला, असे सोबतच्या प्रवाशांनी सांगितले मात्र मयताजवळ केवळ काळी बॅग व चादर आढळली असून मयताच्या खिशात रेल्वे तिकीट, पैसे काहीही आढळले नसल्याने त्याची ओळख पटू शकली नाही. अनोळखी प्रवाशाची ओळख पटत असल्यास भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या एएसआय अरुणा कोहरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.