होंडा सिटीची सुधारित आवृत्ती

0

मुंबई । होंडा कंपनीने भारतात आपल्या होंडा सिटी या मॉडेलची सुधारित आवृत्ती लाँच केली असून याचे विविध व्हेरियंट ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.

होंडा सिटीच्या पेट्रोल आणि डिझेल इंजिनाच्या पर्यायांमधील 11 विविध व्हेरियंटचे दिल्लीतील एक्स-शोरूम मूल्य 8.49 ते 13.56 लाख रूपये दरम्यान असेल. यात काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यात मॉडर्न स्टील मेटॅलिक ग्रे या नवीन रंगाचा समावेश करण्यात आला आहे.

2017 होंडा सिटी या मॉडेलमध्ये सुरक्षेसाठी ड्युअल एयर बॅग्ज, ईबीडीसह एबीएस प्रणाली तसेच मुलांसाठी आयसोफिक्स माऊंट प्रदान करण्यात आले आहेत. यातील उच्च दर्जाच्या व्हेरियंटमध्ये एलईडी हेडलँप असतील. यात अँड्रॉईड प्रणालीवर चालणारी सात इंच टचस्क्रीन डिस्प्ले असणारी इन्फोटेनमेंट प्रणाली प्रदान करण्यात आली आहे. यात 1.5 जीबी इनबिल्ट स्टोअरेजसह दोन मायक्रो-एसडी आणि दोन युएसबी पोर्ट देण्यात आले आहेत. यात रियर व्ह्यू कॅमेरा आणि इलेक्ट्रीक सनरूफही असतील. यात आधीच्या मॉडेलप्रमाणेच 1.5 लीटर क्षमतेचे पेट्रोल आणि डिझेल इंजिन असेल. डिझेलवर चालणार्‍या व्हेरियंटचे मायलेज 25.6 किलोमीटर प्रतिलीटर इतके असून ते आधीपेक्षा 0.4 किलोमीटरने कमी आहे. तर पेट्रोल कारचे मायलेज 1.4 किलोमीटर असून तेदेखील आधीपेक्षा 0.4 किलोमीटरने कमी आहे.