होतकरू विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी ‘सार्थक’चा पुढाकार

0

दानशूर दातांच्या मदतीने पाच वर्षांसाठी २५ विद्यार्थ्यांचे पालकत्व

पुणे । शाळा, पुस्तके, चांगले संस्कार, काळजी आणि प्रेम यांसारख्या गोष्टी सामान्यांना अगदी लहानपणापासून मिळतात. मात्र, पाठीवरची एक कौतुकाची थाप, मायेचे चार शब्द, अभ्यासाबद्दलची विचारपूस व्हावी, यासाठी अनेक होतकरू विद्यार्थी समाजाकडे आस लावून बसले आहेत. समाजातील अशाच गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी कोथरूडमधील ‘सार्थक वेल्फेअर फाउंडेशन’च्या वतीने दानशूर पुणेकरांच्या मदतीने पाच वर्षांसाठी २५ विद्यार्थ्यांचे पालकत्व घेण्याचा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने उपक्रम
प्रत्येक सकारात्मक बदलाची सुरुवात स्वत:पासून होते. त्यामुळे समाजातील ज्या मुलांच्या घरी अभ्यासाकरीता लक्ष देणारे कोणी नाही, ज्यांच्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले आहे, अशा घरांतील गरजू विद्यार्थ्यांकरीता दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने पुढील पाच वर्षे शैक्षणिक सहाय्य करण्यात येणार आहे, असे फाउंडेशनच्या संस्थापक संचालिका स्वाती नामजोशी यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांना लाइफ स्किल्स, स्टडी स्किल्स, व्यक्तिमत्त्व विकास, क्रीडा स्पर्धांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

विविध शाळांमधील गरजू विद्यार्थी
कोथरूडमधील महेश विद्यालय, सिंहगड रस्त्यावरील पालकर हायस्कूल, ज्ञानदा विद्यालय, डहाणूकर कॉलनीतील सरस्वती विद्या मंदिर, टिळक रस्त्यावरील मा.स.गोळवलकर गुरुजी प्रशालेतील हे गरजू विद्यार्थी व दानशूर व्यक्तींची भेट कोथरूडमधील नगरकर प्रशालेत आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांसोबत मनमोकळा संवाद, त्यांना करिअरबद्दल मार्गदर्शन आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याकरीता विविध उपक्रम संस्थेतर्फे राबविण्याचा प्रारंभ करण्यात आला.