न्यूयॉर्क: अमेरिकेतील होनोलुलू या शहरात रस्त्यांवरून चालताना मोबाईलमध्ये पाहणे, एसएमएस करणे, अन्य संदेश पाठवणे किंवा पहाणे तसेच कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तु वापरून वाहतुकीस अडथळा करणे या अपराधांसाठी मोठ्या दंडाची शिक्षा होणार आहे. मोबाईलमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबरपासून हा निर्णय लागू होणार आहे.
रस्त्यांवरून चालताना लॅपटॉप, डिजीटल कॅमेरा पहाणाऱ्यांना १५ ते ३५ डॉलर इतका दंड होऊ शकेल. कुणी आपत्कालीन सेवेसाठी फोन लावीत असेल त्याला मात्र शिक्षेतून सूट असेल. डिस्ट्रॅक्टेड वॉकिंग लॉ म्हणजेच भरकटलेल्या अवस्थेत रस्त्यावरून चालण्याविरोधातील हा कायदा होनोलुलूच्या महापौरांच्या सहीने कायम झाला आहे.
विशेष म्हणजे हा गुन्हा पुन्हा पुन्हा करणाऱ्यांनाही दंडाची विशेष तरतूद आहे. अर्थात मोबाईल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे व्यसन लागलेल्यांनी सरकार खाजगी जीवनात जास्तच दखल द्यायला लागलंय असं म्हणत या कायद्याला विरोध केला.