नवी दिल्ली : पंजाब, गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळाली नाही, त्यानंतर दिल्लीतील तीन महापालिकांमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर आम आदमी पक्षाच्या ध्येयधोरणावर जोरदार टीका होऊ लागली. तसेच पक्षातील नेत्यांनीही आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य करण्यात येऊ लागले. त्यानंतर केजरीवाल यांनी आपण चुकलो,आपल्याला आत्मचिंतनाची गरज आहे, अशी कबुली ट्वीटद्वारे दिली.
गेल्या काही दिवसांत आपण पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि मतदार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आमच्याकडून काही चुका झाल्या याची जाणीव झाली. त्यावर आम्ही आत्मचिंतन करून केलेल्या चुका सुधारू, असेही केजरीवाल म्हणाले. आम्ही केलेल्या चुका सुधारण्याची वेळ आली आहे. ते करणे गरजेचे आहे. आम्हाला आत्मचिंतन करायला हवे. कार्यवाही करण्याची गरज आहे. कारणे देऊन चालणार नाही. आम्हाला पुन्हा कामावर लक्ष केंद्रीत करायला हवे, असे केजरीवाल म्हणाले. वेळोवेळी आम्ही चुका केल्या आहेत. आत्मचिंतन करून दमदार पुनरागमन करायचे आहे. महापालिका निवडणुकांमध्ये पराभव झाला असला तरी त्याचा आमच्या सरकारच्या कामावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिल्लीकरांना दिली. केजरीवाल यांच्या ट्वीटनंतर दिल्लीचे भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांनी केजरीवाल यांनी माफी मागण्यास उशीर केला, अशी खोचक टीका केली.
दरम्यान, महापालिका निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर पक्षाच्या अनेक नेत्यांनी केजरीवाल यांच्यावर सडकून टीका केली होती. पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या कुमार विश्वास यांनीही टीका केली होती. महापालिका निवडणुकीत मतदान यंत्रामुळे (ईव्हीएम) नाही, तर जनतेनेच आपचा पराभव केला. केजरीवाल यांनी सर्जिकल स्ट्राईकवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करायला नको होती, असे ते म्हणाले होते. आपण आपल्या कार्यकर्त्यांशी चांगल्या पद्धतीने संवाद साधला नाही. अनेक महत्त्वाचे निर्णय बंद खोलीत झाले. महापालिका निवडणुकीत चुकीच्या लोकांना तिकीटे देण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला होता. ईव्हीएममध्ये फेरफार हा निवडणुकीचा एक भाग आहे. याबाबत निवडणूक आयोग आणि न्यायालयात आपण तक्रार करू शकतो, असे त्यांनी सुनावले होते.