होय, इतिहास बदलाच…

0

मागील आठवड्यात भारतीय सैन्याने नौशेरा सेक्टरमधील पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या आणि तेव्हापासून भारतीय सैन्यांनी त्यांची पाकिस्तानप्रति असलेली नीती बदलण्यास प्रारंभ केला, असे जाणवले. गेल्या काही महिन्यांपासून सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. शस्त्रसंधीचे उल्लंंघन करण्यासोबतच पाकिस्तानमधून घुसखोरीचे प्रमाणही वाढले होते. त्यासाठी पाकिस्तानचे सैन्य घुसखोरीसाठी मदत करते, या पार्श्‍वभूमीवर भारताने पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने केलेल्या या कारवाईत नौशेरा सेक्टरमधील पाक लष्कराच्या चौक्या उद्ध्वस्त करण्यासाठी एकापाठोपाठ एक स्फोट घडवून आणलेे. भारताने केलेल्या या हल्ल्यात 10 ते 15 पाकिस्तानी सैनिक ठार केले. त्यावर पाकिस्तानचे हवाईप्रमुख सोहेल अमन यांनी भारताने आक्रमकता दाखवू नये अन्यथा भारताच्या पुढच्या पिढ्या लक्षात ठेवतील असे उत्तर देऊ, अशी धमकी दिली. असे असतानाही भारतीय सैन्याने काश्मिरातील त्राल येथे चकमक घडवली. त्यातून दहशतवाद्यांचा खात्मा केला, यात हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर आणि बुरहान वाणीचा साथीदार सबजार अहमद ऊर्फ अबू झरार याला जवानांनी ठार केले.

सबजार मारला जाणे हा दहशतवाद्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. भारतीय जवानांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे पाकिस्तानच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणार्‍या ’हिजबुल मुजाहिद्दीन’ या टोळीला चांगलाच दणका बसला आहे. त्याआधी जम्मू-काश्मीरच्या रामपूर सेक्टरमधून घुसखोरी करणार्‍या 4 दहशतवाद्यांनाही भारतीय जवानांनी कंठस्नान घातले. सीमेवर सैन्याकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली, तेव्हा शनिवार सकाळी लष्कराच्या जवानांना रामपूर सेक्टरजवळ काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यानंतर तत्काळ सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. काही दहशतवादी सीमेजवळील तारा कापून आत घुसले होते. त्यांच्यावर तत्काळ गोळीबार करून लष्कराच्या जवानांनी घुसखोरी करणार्‍या अतिरेक्यांना कंठस्नान घातले. आता बुरहान वाणीचा साथीदार सबजारचा खात्मा झाल्यानंतर बुरहान वाणीप्रमाणे यावेळीही जम्मू-काश्मिरातील विघटनवाद्यांनी दगडफेकीला सुरुवात केली. पुन्हा या दगडफेकीचे चित्रीकरण करून ते सर्वत्र प्रसारित करण्याचा सपाटा लावून वातावरण अधिकाधिक चिघळवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने जम्मू-काश्मीर परिसरातील इंटरनेट सेवा बंद केली. दंगल भडकवण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि ट्विटरसह अन्य काही सोशल नेटवर्किंग साइट्सचा खुबीने प्रयत्न केला जातो, जो बुरहान वाणीला ठार केल्यानंतर काश्मिरात झाला, तसा सबजारच्या हत्येनंतरही सुरू झाला. मात्र, सरकारने तत्काळ याला प्रतिबंध घातला. आता सबजारची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर वातावरण पुन्हा तापवण्याचा प्रयत्न विघटनवाद्यांकडून सुरू झाला आहे. त्यामुळे सरकारने तब्बल 50 हजार सैन्यबळ काश्मिरात उतवले आहे. यावेळी विघटनवाद्यांना अजिबात मोकळीक द्यायची नाही, असा निश्‍चयही सैन्याने केलेला दिसत आहे. बुरहाण वाणीच्या अंत्ययात्रेचा जुलूस काढण्यात आला, तसा जुलूस सबजारचाही काढण्यात येणार, त्यामुळे भारतीय सैन्याने सर्व तयारीनिशी या परिस्थितीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

आज एका कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी गेल्या 70 वर्षांपासून शेजारी राष्ट्र आपल्यासाठी डोकेदुखी ठरत असून, त्यांना बदलणे शक्य नसले तरी आपण इतिहास बदलू शकतो, अशा शब्दांत पाकिस्तानबाबतीत सरकारची बदलेली मानसिकता स्पष्ट केली. उपरोल्लिखित भारतीय जवानांची धडाडीची कामगिरी पाहता मागील 70 वर्षांतील भारत-पाक यांच्यातील इतिहास बदलण्याच्या दृष्टीने भारताचे मार्गक्रमण सुरू झाल्याचे दिसत आहे. हा इतिहास म्हणजे काश्मीरप्रश्‍नी पाकिस्तानसोबत चर्चेचे गुर्‍हाळ सुरू ठेवणे, मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यासाठी भारताकडून वारंवार प्रस्ताव पाठवणे, लाहोरकडे कधी बस तर कधी रेल्वेगाडी सुरू करणे, शस्त्रसंधी सुरू ठेवणे, पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, तरी त्याला ठोस प्रत्युत्तर न देणे, प्रथम आक्रमण न करणे, असा हा आजवरचा भारत-पाकिस्तान यांच्यामधील इतिहास आहे. हा इतिहास बदलण्याचा भल्याभल्या पंतप्रधानांनी प्रयत्न केला. यात लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यांचे नावे पहिले घेता येईल. मात्र, त्यांनीही पाकिस्तान आणि काश्मीर प्रश्‍न कायमचा संपवला नाही. उरलेल्या पंतप्रधानांना या प्रश्‍नांसाठी नवीन वाट शोधणे कधी जमलेच नाही. तीच तीच मैत्रीसंबंधांच्या मळलेल्या जुन्या वाटेवर चालण्यात उर्वरित पंतप्रधानांनी धन्यता मानली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी याला अपवाद ठरत आहेत. इतिहास बदलण्याची भाषा प्रथमच झाली आहे, तो बदलून नवीन इतिहास घडावा, त्यासाठी 125 कोटी जनतेच्या शुभेच्छा आहेत.