धुळे। ‘होय त्या सीडीतील आवाज माझाच आहे. सत्य कबूल करायला मी घाबरत नाही!’ अशी सुरुवात करीत आ.अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीने त्यांच्या आणि भिसे यांच्यातील संवादाच्या पार्श्वभूमिवर त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाचे खंडन केले. मात्र आपण लक्षवेधीसाठी कुठल्याही प्रकारे पैशांची मागणी केलेली नसल्याचे त्यांनी ठासून सांगितले.
क्लीप सहा महिन्यांपूर्वीची…
मी नवीन करंसी म्हटले आहे. या 7 मिनिटे 23 सेकंदाच्या सिडीत आपण पैशाचा उल्लेख कोठे केला? असा प्रतिप्रश्नच त्यांनी यावेळी विचारला. ही ऑडीओ क्लिप ही सहा महिन्यांपुर्वीची असून त्यावेळी नागपुरात जुन्या नोटा कोणी स्विकारत नव्हते. आम्हाला अगदी पेट्रोल पंपावर देखील मिनतवार्या करुन जुन्या नोटा घेण्यास सांगावे लागत होते. अशावेळी मुंबईतला माणूस नागपुरात आल्यानंतर त्याला अडचण आली तर तो आपल्याकडेच मदत मागेल. अशावेळी त्याची अडचण होवू नये म्हणून नवीन करंसी आण, असे स्पष्ट शब्दात त्याला सांगितले, असा खुलासा आ.गोटे यांनी यावेळी केला. तसेच हे रेकाँर्डींगचे षडयंत्र समृध्दी महामार्गाचा तत्कालीन व्यपस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवारांचे असून त्यांनीच ही ऑडीओ क्लिप स्थानिक राष्ट्रवादीला दिली आहे. त्यांच्या आधी मीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझ्या ऑडीओ क्लिप संभाषणाची कसून चौकशी करावी, अशी मागणी करणार आहोत, असे आ.गोटे यांनी सांगितले.
मोपलवारांचे कारस्थान
आ.गोटे यांनी सर्व आरोपांचे खंडन करतांना सांगितले की, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पत्रकारांना आणि माध्यमांना जी ऑडीओ क्लिप दिली. ती राधेश्याम मोपलवार यानेच दिल्याची माझा दावा आहे. कारण, गेल्या 95 सालापासून मी मोपलवारच्या मागे लागलो आहे. यामुळे माझे संभाषण रेकाँर्डींग करुन मला काही प्रकरणांमध्ये अडकविण्यासाठी मोपलवार हा विविध फंडे वापरत होता. मला अडकवण्यासाठी षडयंत्र रचत होता. पण, मी कोणालाही घाबरत नाही. माझ्याकडेही मोपलवारच्या वादग्रस्त संभाषणांच्या सुमारे 35 सीडी असल्याचा दावादेखील त्यांनी केला.