होय! मुठा नदीही म्हणतेय ’Mee Too’

0

पुणे : ‘हो, मी पीडित आहे. ’Mee Too’अशा आशयाचे फलक पुण्यातील ओंकारेश्‍वर पुलावर लावण्यात आला आहे. हा फलक पुण्याची जीवनवाहिनी असलेल्या मुळा-मुठा नदीचे वास्तव मांडणारा आहे. ’Mee Too’ मोहिमेच्या अंतर्गत आता पुण्यातील नद्यांवर, त्यांच्यावरील अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला आहे. आज मुळा-मुठा नद्यांची अवस्था अत्यंत भीषण झालेली आहे. या नद्या अक्षरश: गटारगंगा झाल्या आहेत.

‘गेली कित्येक दशक हे माझ्या संमतीशिवाय होत आलय, कधी माझ्या गर्भातून वाळू उपसा तर कधी घराघरातील सांडपाणी, कधी निर्माल्याच्या रुपात कचरा तर कधी असभ्य, असंस्कृतांची मनमानी. ‘हो मी पीडित आहे ’Mee Too’ या आशयातून नद्यांनी आपल्यावरही अत्याचार होत असल्याची भावना जणू व्यक्त केली आहे. तसेच नदी प्रदूषित अथवा कोणतेही सार्वजनिक जलप्रवाह प्रदूषण करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता कलम (277) अंतर्गत 3 महिने कारावास, दंड किंवा दोन्ही कलमास पात्र राहील अशी चेतावणी देखील फलकावर दिली आहे. अतिशय कल्पकपद्धतीने या मजकुरातून मुळा-मुठेचे भयाण वास्तव यातून मांडण्यात आले आहे. त्यामुळे आता याचे गांभीर्य ओळखून महापालिका प्रशासन किंवा नागरीक नदीच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही.