होय, संत ज्ञानेश्वरांचे नाव बदलून मिर्झा गालिब केले!

0

मुंबई | “तावडेमियांच्या अल्पसंख्यांक खात्याला संत ज्ञानेश्वरांचे वावडे!” अशी बातमी ‘जनशक्ति’ने सोमवार, 31 जुलैच्या अंकात प्रसिद्ध केली होती. अल्पसंख्यांक विकास विभागातील उर्दू अकादमीतर्फे दरवर्षी साहित्य क्षेत्रात चांगली कामगिरी बजावणाऱ्या साहित्यिकांना पुरस्काराने सन्मानित केले जाते. त्यातील ‘संत ज्ञानेश्वर पुरस्कारा’चे नाव बदलून ‘मिर्झा गालिब जीवन गौरव पुरस्कार’ असे करण्यात आले आहे. त्यावर अल्पसंख्यांक खात्यातर्फे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या उपसंचालक (वृत्त) यांनी ‘जनशक्ति’कडे खुलासा पाठविला आहे. अल्पसंख्यांक, सांस्कृतिक कार्य या दोन विभागांचे पुरस्कार एकाच नावाने नसावेत म्हणून कवी मिर्झा गालिब जीवनगौरव पुरस्कार असे नामकरण केले, असे या खुलाशात म्हटले आहे.

हा खुलासा जशाच्या तशा शब्दात …
अल्पसंख्यांक, सांस्कृतिक कार्य या दोन विभागांचे पुरस्कार एकाच नावाने नसावेत म्हणून कवी मिर्झा गालिब जीवनगौरव पुरस्कार असे नामकरण केले : अल्पसंख्याक विकास विभागाचा खुलासा राष्ट्रीय स्तरावर उर्दू भाषेतून लिखाण करणाऱ्या सुप्रसिध्द आणि नामवंत लेखक – साहित्यिक अथवा शायर यांना त्यांच्या योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या जीवन गौरव पुरस्काराला त्याचे राष्ट्रीय स्तरावरचे स्वरुप पाहता कवी मिर्झा गालिब जीवनगौरव पुरस्कार असे नाव देण्यात आले आहे. हाच पुरस्कारसंत ज्ञानेश्वर पुरस्कार या नावाने देण्यात येत होता, मात्र, सांस्कृतिक कार्य विभागातर्फे संत ज्ञानेश्वर या नावाने पूर्वीपासूनच पुरस्कार देण्यात येत असल्याने एकाच नावाने दोन विभागांचे पुरस्कार असू नयेत असा विचार पुढे आल्यामुळे पुरस्काराचे नाव बदलण्यात आले, असे अल्पसंख्यांक विभागाने कळवले आहे.

उर्दू साहित्य क्षेत्रात मिर्झा गालिब यांचे योगदान पाहता उर्दू भाषेतून देण्यात येणारा पुरस्कार हा त्या क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या नावांने देण्याच्या उद्देशानेच हा पुरस्कार मिर्झा गालिब या नांवाने देण्यात येणार असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे.

उर्दू भाषेच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आली आहे. अकादमीची उद्दिष्ट्ये व अकादमीमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेऊन त्यात आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. तसेच, प्रत्येकवर्षी उर्दू भाषेतून लिखाण करणाऱ्या एका महाराष्ट्रातील सुप्रसिध्द व नामवंत लेखक साहित्यिक अथवा शाहीर यांना साहित्य क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार देण्यातयेतो. हा पुरस्कार राज्यस्तरीय पातळीवर प्रदान करण्यात येतो. वलि दख्खनी हे राज्य पातळीवरील उर्दू साहित्यातील नामांकित साहित्यिक असल्याने सदर पुरस्कारास त्यांचे नांव देण्यात आले आहे, असेही अल्पसंख्यांक विभागाने कळवले आहे. २०१५ व २०१६ या दोन वर्षात उर्दू अकादमीच्या वतीने उर्दू साहित्यिकांना देण्यात येणारे पुरस्कार यावर्षी एकत्रितपणे प्रदान करण्यात येतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.