पिंपरी-चिंचवड : शहरातील अनधिकृत होर्डिंग हटविण्याच्या ठेक्याशी भाजपाच्या कोणत्याही पदाधिकार्याचा संबंध नाही. तसेच होर्डिंग हटविण्याचा खर्च संबंधित होर्डिंगवाल्यांकडून वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे याबाबत पूर्ण माहिती घेऊन विरोधकांनी शहानिशा करावी. महापालिकेतर्फे कारवाई सुरू झाल्याने अशा होर्डिंगवाल्यांची आणि फुकट्या जाहिरातदारांची दुकानदारी बंद झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनावर आणि सत्ताधारी भाजपवर बेछुट आणि बिनबुडाचे आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहेत. असे न करता सबळ पुरावे सादर करावेत, असे आव्हान भाजपाचे शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.
विरोधकांची दुकानदारी
शहरातील अनधिकृत होर्डिंग हटविण्याबाबत महापालिका न्यायालयाच्या निर्देशानुसार धोरण राबवित आहे. होर्डिंग हटविण्यासाठी प्रशासनाने रितसर कायदेशीर बाबींची पुर्तता करून निविदा प्रक्रिया राबवून त्याचा ठेका दिलेला आहे. शहर सौंदर्यास बाधा व पुण्यासारखा अपघात होवू नये यासाठी अनधिकृत होर्डिंग हटविण्यात येत आहेत. त्यामुळे अशा अनधिकृत होर्डिंगवाल्यांचे धाबे दणाणले आहे. अशा होर्डिंगवाल्यांची आणि फुकट्या जाहिरातदारांची दुकानदारी बंद झाल्याने त्यांच्याकडून काहूर माजविण्यात येत आहे. विरोधकांशी हातमिळवणी करून भाजपाविरोधात चुकीचा प्रचार करण्यात येत आहे. त्यासाठी बेछुट आणि बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत.
महसुलात वाढच होईल
महापालिकेचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. जनरेट्यामुळे महापालिका प्रशासनाने होर्डिंग हटविण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. शहरात सर्वत्र अधिकृत होर्डिंग राहिल्यास महसुलात मोठी वाढ होईल. नेमकी हीच बाब विरोधकांना आणि फुकट्या जाहिरातबाजांना खटकत आहे. त्यामुळे असे आरोप करण्यात येत आहेत, असेही पत्रकात म्हटले आहे.