दोन महिन्यानंतरही अहवाल नाही; काम अजूनही सुरूच असल्याचे स्पष्टीकरण
पुणे : जुना बाजार परिसरातील शाहीर अमर शेख चौकात होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेला दोन महिने पूर्ण होत आहेत. यात चौघांचा मृत्यू, तर काहीजण गंभीर जखमी झाले. याबाबत रेल्वे प्रशासनाने तातडीने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करून पंधरा दिवसांत अहवाल सादर करू, असे सांगितले होते. मात्र, दोन महिन्यांनंतरही अहवाल पूर्ण झाला नसून काम अजूनही सुरूच असल्याचे सांगण्यात येत आहे.
शाहीर अमर शेख चौकातील होर्डिंग रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच पडल्याची टीका सर्व स्तरांतून करण्यात आली. यामुळे चौकशीसाठी घटनेच्या दोन दिवसांनी रेल्वे प्रशासनाने उच्चस्तरीय अधिकार्यांची चौकशी समिती स्थापली. यात मध्य रेल्वेचे उपमुख्य अभियंता ए. के. सिंग, उपमुख्य सुरक्षा अधिकारी शिवकुमार, उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक के. व्ही. थॉमस तसेच पुणे विभागातील वरिष्ठ सुरक्षा अधिकारी डी. विकास यांचा समावेश होता. यावेळी पुढील पंधरा दिवसांत अहवाल सादर करू,’ असे प्रशासनाने सांगितले होते. मात्र, या घटनेला दोन महिने उलटले तरी अहवाल पूर्ण झालेला नाही. दरम्यान, रेल्वेच्या दोन लोकांना अटक झाल्याने अहवाल पूर्ण करण्यात अडचणी येत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात येत होते. मात्र, त्यांना जामीन मिळूनही पंधरवडा उलटूनही त्यांची चौकशी अपूर्ण आहे.