रेल्वे प्रशासनाची कबुली; मात्र होर्डिंग अधिकृत असल्याचा खुलासा
दुर्घटनाप्रकरणी अभियंता व कर्मचार्याला अटक
पुणे : जुना बाजार येथील होर्डिंग नियमानुसार बसविण्यात आले होते. ते अवैध नसल्याचा खुलासा रेल्वेच्या पुणे परिमंडळ विभागाचे प्रमुख मिलिंद देऊस्कर यांनी केला आहे. होर्डिंग कोसळले त्यासाठी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरण्यात येत आहे. यासंदर्भात माहिती देताना देऊस्कर यांनी ही घटना दुर्देवी असल्याचे म्हटले आहे. होर्डिंग हटविताना हलगर्जीपणा झाल्यामुळेच ही घटना घडली आहे. त्याबाबतच उच्चस्तरीय समिती निष्पक्ष चौकशी करत आहे. त्याचबरोबर घोरपडी आणि जुना बाजार येथील होर्डिंग काढण्याच्या जबाबदारी ही वेगवेगळ्या ठेकदारांकडे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
होर्डिंग खूपच कमकुवत झाल्यावर रेल्वे प्रशासनाने ते पाडण्याचे काम शुक्रवारी दुपारी हाती घेतले होते. यावेळी होर्डिंग गॅस कटरच्या सहाय्याने खालच्या बाजूने कापत असताना ते सिग्नलवर थांबलेल्या सहा रिक्षा, एक कार व दोन दुचाकींवर पडले. होर्डिंग कोसळून चौघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी रेल्वेच्या अभियंता आणि एका कर्मचार्याला अटक करण्यात आली आहे. रेल्वे अभियंता संजय सिंग तर कर्मचारी पांडुरंग वनारे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी ठेकेदार मलिक्कार्जुन मलकापुरे, उपठेकेदार जीवन मांढरे तसेच सांगडा काढण्याचे काम करणार्या मजुरांविरुद्ध पोलिसांकडून सदोष मनुष्यवधाचा (भादंवि 304) गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एम. मुजावर यांनी दिली.
होर्डिंग हटविण्यात दिरंगाई नाही
तसेच, होर्डिंगबाबत महापालिकेने रेल्वे प्रशासनाला 2013पासून पत्राद्वारे वेळोवळी सांगितल्याचा दावा केला होता. मात्र, होर्डिंग हटविण्यात कुठलीही दिरंगाई झाली नसल्याचेही देऊस्कर यांनी स्पष्ट केले आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने स्वत: ही होर्डिंग काढून टाकण्यात येत होती. तीन होर्डिंग नीट काढण्यात आले. मात्र, शेवटचे होर्डिंग काढताना हलगर्जीपणा झाल्याची कबुली त्यांनी दिली. शुक्रवारी घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी मुंबई येथून रेल्वेची उच्चस्तरीय चौकशी समिती शनिवारी सकाळी पुण्यात आली असून या समितीमध्ये रेल्वेच्या वरिष्ठ स्तरावरील अभियंत्यांचा समावेश आहे.
एजन्सीने ऑडिट सादर केले नाही
दरम्यान होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात प्रकरणी रेल्वे प्रशासनाने ही घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. हे होर्डिंग एका अॅड एजन्सीला दिले होते. या होर्डिंगचा ढाचा मजबूत नव्हता. त्यामुळे मध्य रेल्वेने एजन्सीला वारंवार सांगूनही होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट रेल्वे प्रशासनाकडे सादर करण्यात आले नाही. अखेर रेल्वे प्रशासनाने हे काम त्यांच्याकडून काढून दुसर्या एजन्सीला दिले. होर्डिंग हटवण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू होते.
कुटुंबियांना पाच लाखांची मदत
मध्य रेल्वेमार्फत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये दिले जाणार असून, गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना एक लाख रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे. किरकोळ जखमी व्यक्तींना 50 हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.