नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे यांचा इशारा
पिंपरी : पिंपरीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात पुणे महामेट्रोतर्फे बांधण्यात येणार्या मेट्रो स्टेशनमुळे अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचा दर्शनी भाग झाकला जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणाचा मेट्रो स्टेशनचा आराखडा बदलण्याची मागणी धनगर महासंघाने केली आहे. अन्यथा येत्या सोमवारपासून (दि.19) मेट्रोचे काम बंद पाडण्याचा इशारा देण्यात आल्याचे नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे यांनी सांगितले. पुणे मेट्रो कार्पोरेशनचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम् यांना श्रीमंत मल्हारराव होळकर प्रतिष्ठान, कर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव कमिटी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघ सांगवी आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांनी निवेदन दिले आहे.
मेट्रो स्टेशन उभारले
हे देखील वाचा
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे, मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्यावतीने महापालिका हद्दीमध्ये दापोडी ते एम्पायर इस्टेट पुलापर्यंत काम सुरू आहे. पिंपरीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात मेट्रोचे स्टेशन बांधले जाणार आहे. त्यामुळे अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचा दर्शनी भाग झाकला जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणाचा मेट्रो स्टेशनचा आराखडा बदलण्यात यावा. समाजाचा मेट्रोच्या कामाला विरोध नाही. परंतु मेट्रो स्टेशनचे काम सुरू करण्यापूर्वी त्याचा नियोजित आराखडा दाखवण्याची विनंती मेट्रोच्या प्रतिनिधींकडे केली होती. मेट्रोच्या अधिकार्यांशी झालेल्या बैठकीत पुतळ्याला कोणतीही बाधा पोहचणार नाही, असे आश्वासनही दिले गेले. परंतु, सध्याच्या मेट्रोच्या आराखड्यावरून यामध्ये काहीही सुधारणा किंवा दुरूस्ती केल्याचे साईटवरील कामावरून दिसून येत नाही. अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा स्टेशनच्या पिलरमुळे झाकला जाणार आहे. त्यामुळे पुतळ्याच्या सौंदर्यामध्ये बाधा येणार आहे.
ग्रेडसेपरेटरला होळकरांचे नाव
तसेच समाजाचे प्रेरणास्थळ काही अंशी कायमस्वरूपी झाकले जाणार आहे. त्यामुळे मेट्रो स्टेशनचा आराखडा बदलून स्टेशन अहिल्यादेवी होळकर चौकालगत एम्पायर इस्टेट पुलाच्या बाजूला स्थलांतरीत करण्यात यावे. या चौकातील पीएमपीएमएल बस थांबा, ग्रेडसेपरेटर यांना अहिल्यादेवी होळकर चौक असे नाव देण्यात यावे. यावेळी विलास महानवर, सुर्यकांत गोफणे, विजय वाघमोडे, अभिमन्यू गाडेकर, बाबासाहेब चितळकर, अभिजित शेंडगे, गोरख खामगळ, संतोष वाघमोडे, भरत महानवर, गणेश आडुळे, दिरू वनमाने, विठ्ठल सरेकर, संजय शेंडगे, सुमित पांढरे, राजू धायुगडे, अशोक उकले, महापालिकेचे अधिकारी श्रीकांत सवने, ज्ञानदेव झुंधारे, विजय भोजने, तर मेट्रोचे अधिकारी नागेश्वर राव, रणजित कुमार, बापू गायकवाड उपस्थित होते.