पुणे । अंधश्रध्देला बळी पडून एखाद्यावर करणी करण्याची पध्दत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात रुढ आहे. एखाद्याचे वाईट व्हावे किंवा एखाद्याने आपले वाईट व्हावे, असे चितले असेल तर तसे होऊ नये म्हणून करणीचा प्रकार केला जातो. पुण्यासारख्या सुसांस्कृतीक शहरातही याचे प्रमाण मोठे आहे. या अंधश्रध्देतूनच होळकर ब्रीज येथील काही झाडांना मोठ्या प्रमाणात करणीसाठी लिंबू मिरची आणि काळ्या भावल्या बांधल्या जात होत्या. हा प्रकार अंधश्रध्देला खतपाणी घालणारा असल्याने शनिवारी अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेतली. तेथील झाडांना बांधलेल्या काळ्या बाहुल्या आणि लिंबू उखडून काढली.
अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी याबाबतची माहिती दिली. होळकर ब्रीजच्या बाजूला म्हसोबाचे मंदिर आहे. तेथे असणार्या काही झाडांवर मोठ्या प्रमाणात करणीचे साहित्य लावलेले होते. सहा महिन्यापूर्वीच येथून तब्बल तीन पोटी करणीचे साहित्य झाडावरून काढले होते. यानंतर आम्ही येथे सातत्याने लक्ष ठेऊन होतो. येथे पुन्हा मोठ्या प्रमाणात झाडाला करणीचे साहित्य अडकवलेले आढळले. यामुळे खडकी पोलिस ठाण्यांतर्गत मरिर्याई गेट पोलिस चौकीत एक अर्ज दिला. यानंतर पोलिसांच्या मदतीने सहा झाडांना ठोकलेले करणीचे साहित्य काढून टाकले. हे सर्व साहित्य जाळून टाकण्यात आले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक शिवाजी भोसले, राज्य सचिव मिलींद देशमुख, कुणाल शिरसाठ, भगवान काळभोर, श्रीराम नलावडे, सुभाष सोळंकी आदी उपस्थित होते.
छायाचित्रांवर रक्ताचे थेंब
समाजामधील अंधश्रध्दाळू व्यक्ती एखाद्याचे वाईट करायचे असेल तर त्यावर करणी करण्याचा प्रकार करतात. करणी करण्याचा सल्ला भोंदु बाबा पैसे घेऊन देत असतात. किंवा एखाद्या व्यक्तीस काही शारीरीक व मानसिक त्रास होत असेल तर भोंदु बाबा त्याला कोणतरी करणी केल्याचे सांगतात. यामुळे एखाद्यावर करणी करण्यासाठी तसेच केलेली करणी उतरवण्यासाठी अमावस्येच्या रात्री विधी करून गावाबाहेरील झाडाबाहेर करणीचे साहित्य खिळ्याने ठोकण्याचा उपाय सूचवला जातो. यासाठी भोंदूबाबा 500 ते 5000 हजार रुपयांपर्यत पैसे उकळतात. होळकर ब्रीज येथील झाडांवरही अशा प्रकारचे करणीचे साहित्य मोठ्या प्रमाणात खिळ्याने ठोकण्यात आले होते. यामध्ये पिशव्यांमध्ये काळी बाहुली, बिबवा, लिंबु आणि ज्यावर करणी करायची आहे, त्याचे छायाचित्र खिळ्याच्या सहाय्याने ठोकण्यात आले होते. यातील काही छायाचित्रांनातर रक्त लावण्यात आले होते.