होळनांथे (योगेश पाटील) । शिरपूर तालुक्यातील एक आर्दश गाव, स्वच्छ गाव, तंटामुक्त गाव, आदर्श शाळा, लाखो रूपयांचे राज्य स्तरीय पुरस्कार प्राप्त गाव, जैन समाजाचे श्रध्दास्थान, स्व.कन्हैय्यालाल महाराजांनी समाधी म्हणून परिचीत असलेले गाव म्हणजे होळनांथे गाव सध्या अवैध धंद्याचे प्रमुख केंद्रस्थान होऊ पाहत आहे. तालुका, जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात तीन तीनदा आदर्श गाव व स्वच्छ गावाचा पुरस्कार मिळविणार्या होळनांथे गावात चोर्या, दंगे, हाणामार्यासह अवैध धंदे सर्वत्र सुरू असून याला जबाबदार कोण? हा संशोधनाचा विषय झाला आहे.
व्यसनात डुबली तरूणाई
परिसरात अवैध धंदे वाढल्यामुळे तरूण वर्ग ताडी,दारू तसेच सट्टा,जुगारच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होत आहेत. तर काही तरूणांची अवस्था दैयनीय झाली असून दररोज अड्डयावर ठिय्या मांडून बसलेले असल्याने कोवळ्या वयातली मुले व्यसनाकडे ओढली जात असून गावाचे भविष्याची गंभीर परिस्थीती होण्याचे चिन्ह आहेत.
दखल न घेतल्यास दुर्दशा
खुले आम राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध धंद्याची वेळीच दखल घेऊन कारवाई नाही केली तर परिणामी तरूण व अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी जाऊन नशेच्या धुंदीत कळत न कळत त्यांच्याकडून अपराध घडत आहेत. घडतील, रोज वाद निर्माण होवून हाणामार्यांचे प्रमाण वाढत आहे. याची वेळीच दक्षता नाही घेतली तर भविष्यात होळनांथे गावाची दुर्दशा फार गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चोर्यांचे वाढते प्रमाण
सध्या परिसरात छोट्या मोठ्या चोर्यासह मोबाईव व दुचाकी चोरीच्या प्रमाण वाढले असून याबाबत गुन्हा दाखल करण्यास पोलीसांकडून टाळाटाळ केली जाते. गेल्या महिन्यात गणेश नगर परिसरात दोन वेळा चोरांनी धुमाकूळ घातला असून मध्येरात्री दरवाजा ठोकणे, खिडक्यांमधून हात टाकून मोबाईल व इतर घरातील वस्तू लांबवीण्याचे प्रकार घडत आहेत. तर गेल्या सहा महिन्यात दोन दुचाकी चोरीस गेल्या आहेत. त्यात एक मोटार सायकल कोणी लांबवीली याची नोंद फिर्यादीने संशयित आरोपीच्या नावाने केली असून संशयित त्या दिवसापासुन फरार आहे. तरीदेखील त्या संशयिताचा तपास लावण्यात पोलीसांची हलगर्जी दिसून येत आहे.
महिलांना बस स्टॉपला थाबणे कठीण
बस स्टँड परिसरात मोठ्या प्रमाणात दारू विकली जात असल्यामुळे या ठिकाणी दारूड्यांचे वास्तव्य अधिकप्रमाणात आहे. त्यामुळे महिला व मुली जास्त वेळ बसस्थानकावर उभे राहुन बसची वाट पाहायला घाबरतात. महिला मुलींना छेळखानीचे प्रकार होत असल्याने महिलांना बसस्थानकात अधिक वेळ थांबणे कठीण झाले
अवैध धंदे तेजीत
होळनांथे परिसरात सट्टा,मटका,जुगार,दारू,ताडी,गुटक्यासारखे अवैध धंदे खुले आम सुरू असून गल्लीबोळ्यात गावठी दारू विकली जात असल्याचे दिसून येते. याबाबत वेळोवेळी वृत्तपत्रात बातम्याही प्रसिद्ध होत असल्या तरी बातमीचा परिणाम म्हणून पोलीस प्रशासनाकडून किरकोळ विक्रेत्यांवर थातूर मातूर कारवाई करण्यात येते. मात्र बडे मासे हे मोकळेच फिरत असल्याचे चित्र आहे. त्यांच्यापर्यंत पोहचण्याची एकतर पोलीसांची हिम्मत होत नाही किंवा हिमतीची दाद आधीच मोजली जात असल्याने याकडे दुर्लष केले जात आहे.
लोकप्रतिनिधींच्या देखावा
वाढत्या अवैध धंद्याना लगाम बसावी म्हणून येथील लोकप्रतिनीधीही अवैध धंद्याविरोधात पोलीसात धाव घेतात खरे मात्र हेच लोकप्रतिनिधी आपल्या कार्यकर्त्यांच्या भल्यासाठी पोलीस स्टेशनला फक्त चकरा मारून परत येतात. तर पोलीसांशी संपर्क साधून अवैध धंद्याची मुक संमती मिळवितात. तर दुसरीकडे अवैध धंदे बंदीसाठी पत्रव्यवहार करून आपली बाजू सुरक्षीत करतात. त्यामुळे नेमके ह्या धंदे अधिक प्रमाणात फोफावण्यामागे जबाबदार कोण ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
बस स्टँडवरून फिरतात सुत्रे
येथील अवैध धंद्याची सुत्रे ही बस स्टँडवरूनच फिरत असतात. बस स्टँड परिसरातच दहा ते बारा सट्टा पिड्या चालत असून बहुतेक दारू दुकाने ही याच परिसरात आहेत. तर ताडीचे दुकाने ही काही हाकेच्या अंतरावर आहेत. बस स्टँड सारख्या वर्दळीच्या व सार्वजनिक जागेवरच अवैध धंद्याचे मुख्य स्थान आहे. तरी याबाबत पोलीसांना माहिती नाही की, अर्थपुर्ण संबध जोपासले जात आहेत अशी एकच चर्चा गावातून होत आहे. यावर पोलिस प्रशासनाने त्वारीत कारवाई करवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.