होळीच्या कार्यक्रमातील सहभाग शरीफांना भोवला

0

इस्लामाबाद। होळीच्या कार्यक्रमात मित्रत्व, बंधुत्वाचा संदेश देणे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना चांगलेच महाग पडले आहे. हा संदेश दिल्यामुळे ईशनिंदा झाल्याचा आरोप करत शरीफ यांच्याविरोधात फतवा जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या अहले सुन्नत वा जामाचे नेते आणि इत्तेहाद कॉन्सीलचे सचिव अल्लामा अशरफ जलाली म्हणाले की, नवाझ शरीफ यांनी केवळ इस्लामची निंदा केली नसून, त्यांनी पाकिस्तानच्या सैद्धांतिक विचारधारेला काळीमा फासला आहे.

नवाझ शरीफ यांनी 14 मार्च रोजी पाकिस्तानात अल्पसंख्याक असलेल्या हिंदु समुदायाच्या होळी सणाच्या दिवशी सगळ्यांना बंधुत्वाचा संदेश दिला. कराचीत होळीच्या निमित्ताने झालेल्या एका कार्यक्रमात शरीफ यांनी हॅप्पी होली अशा शुभेच्छा देत संभाषणाला सुरुवात केली होती. यावेळी बोलताना, पाकिस्तानातील अल्पसंख्यांक समुदायाची दुर्दशा लपून राहिलेली नाही. त्यांना जबरदस्तीने इस्लाममध्ये आणण्याची जगभरातून निंदा होत आहे. एका धर्माने दुसर्‍या धर्मावर वर्चस्व मिळवण्यासाठी पाकिस्तानची निर्मिती झाली नसल्याचे शरीफ यांनी सांगितले होते. याशिवाय शरीफ म्हणाले की, जबरदस्तीने केलेल्या धर्मांतराला इस्लाममध्ये अपराध केल्याचे समजले जाते. पाकिस्तानात सर्वांनी सहिष्णूता, धार्मिक सद्भावना आणि शांततेने रहावे. या कार्यक्रमाच्या सुरुवातील गायत्री मंत्राचे पठण करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित नागरिकांना शरीफ यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

अनेक राजकीय नेत्यांविरुद्ध फतवे
क्रुफ फतवा जाहीर होणारे नवाझ शरीफ पहिलेच राजकीय नेता नाहीत. याआधीही पाकिस्तानच्या अनेक राजकीय नेत्यांविरुद्ध असे फतवे काढण्यात आले होते. याप्रकरणी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पंतप्रधान म्हणून घेतलेली शपथ मोडली असल्याचे सांगून त्यांनी माफी मागावी, अशी मागणी मौलवी जलाली यांनी केली आहे. याआधी पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पार्टीचे प्रमुख इम्रान खान यांच्याविरोधातही ईशनिंदा केल्याप्रकरणी फतवा काढण्यात आला होता. त्यावेळी इम्रान खान यांनी माफी मागितली होती. ईशनिंदेच्या प्रकरणी पाकिस्तानात नेहमीच वाद निर्माण होत असतात.