होळीला तंबाखुची होळी करा!

0

नंदुरबार । होलिकोत्सवात गावात मुले, तरुणांची फेरी काढून तंबाखूजन्य पदार्थांची पाकिटे गोळा करावी; ती एका खड्ड्यात पुरावी. होळीला तंबाखूजन्य पदार्थांच्या नावाच्या पट्ट्या लावून तंबाखूची प्रतीकात्मक होळी करून, आजन्म तंबाखूजन्य पदार्थांचे स्वतः आणि इतरांना सेवन न करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी केले आहे. तंबाखुमुक्त अभियानाच्या निमित्ताने ते बोलत होते.

व्यसनमुक्तीसाठी पुढाकार
या तपासणीत सर्व शाळा जागतिक आरोग्य संघटनेचे निकष पूर्ण करुन तंबाखूमुक्त आढळल्या तर नंदुरबार जिल्हा जगातील तिसरा तंबाखूमुक्त शाळांचा जिल्हा 8 मार्च रोजी (महिला दिन) घोषित करण्याचा मानस असल्याचे डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी सांगितले. नंदुरबार जिल्ह्यातील विविध शासकीय विभाग आणि सामाजिक संस्थांनी पुढे येऊन नंदुरबार जिल्हा व्यसनमुक्त बनविण्यासाठी पुढाकार घेण्याबद्दल डॉ.कलशेट्टी आग्रही आहेत.

शाळांमध्ये विविध उपक्रम
जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या पुढाकाराने नंदुरबार जिल्ह्यात तंबाखूमुक्त अभियान राबविले जात आहे. तंबाखूचे दुष्परिणाम सर्वश्रुत असल्याने त्याची सवय नव्या पिढीस होऊ नये, यासाठी सलाम मुंबई फाऊंडेशन आणि शिक्षण विभाग, जि.पं. नंदुरबार ‘तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था अभियान’ राबवीत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांद्वारे शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये व्यसनविरोधी मानसिकता निर्माण व्हावी, यासाठी शाळेत विविध उपक्रम राबविले गेले आहेत.

विद्यार्थ्यांना दिली जातेय माहिती
परिपाठाला विद्यार्थ्यांना तंबाखूबाबत माहिती देणे, विद्यार्थ्यांकडून तंबाखू विरोधी पोस्टर, घोषवाक्ये, पथनाट्य, कविता बनवून घेणे, तसेच संपूर्ण जिल्ह्यात एकाचवेळी गांधी जयंती आणि जागतिक कर्करोग दिन याचे औचित्य साधत तंबाखूमुक्तीपर संकल्प घेणे, आपल्या पालकांना आणि परिजनांना तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी पत्र लिहिणे, शाळेत 30 डिसेंबरच्या दिवशी तंबाखूचा राक्षस जाळणे, असे विविध उपक्रम या शैक्षणिक वर्षात घेण्यात आले. शाळांमध्ये त्र्ययस्थ संस्थांद्वारे तपासणी करुन घेतली जात आहे.