होळी माळावरील अतिक्रमण हटवण्याचा ग्रामस्थांचा एल्गार

0

खालापूर । वाशिवली येथील होळीमाळावरील अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे. यासंदर्भात ग्रुप ग्रामपंचायत वडगावने होळीमाळावरील अतिक्रमण थांबवण्याचे आदेश दिले आहेत. सर्व्हे. नं. 5/3 हा होळीमाळ याला लागून असून ही जागा आमच्याच सर्वेतील आहे, असे भासवून दुसर्‍या व्यक्तींना विकून व्यवसाय सुरू आहे. त्यांच्या मालकीतील सर्वे नं. 5/3 ही जागा एका बिल्डरला डेव्हलपमेंटसाठी विकली असून सदर बांधकाम सुरू असलेली जागा ग्रामस्थांच्या होळीमाळाची असल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी बांधकाम सुरू असल्याने येथील ग्रामस्थांच्या सण-उत्सवावर गदा आली होती. त्यामुळे ग्रामस्थांनी होळी सण कोठे साजरा करायचा, अशी संतप्त भावना व्यक्त केली.

जलदगतीने सुरू होते बांधकाम
ग्रामसेवक रजेवर गेल्यामुळे त्याचा फायदा उठवून होळीमाळाच्या ठिकाणी अति जलदगतीने बांधकाम सुरू होते. मात्र, गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत यांच्या दबावामुळे हे अतिक्रमण थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहे. हे अतिक्रमण 30 दिवसात पूर्णपणे भुईसपाट करावे, असे पत्र ग्रामपंचायत वडगाव यांनी होळीमाळावरील बांधकाम करणार्‍या व्यक्तीस दिले आहे तसेच हे अतिक्रमण पूर्णपणे काढले नाही, तर कारवाई करून होणार्‍या खर्चाची वसुली करण्यात येईल, असे लेखीपत्र संबंधित अतिक्रमणधारकास देण्यात आलेे. वाशिवलीतील होळीमाळावरील होत असलेले अतिक्रमण बांधकाम तातडीने थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.