धुळे । प्राचीन काळी एक नागा साधू(नागेश्वर नामक) हे होळ ता.शिंदखेडा येथे आले होते. सोबत त्यांनी महादेवाची पिंड आणली होती. ही घटना 17 व्या शतकातील आहे. नागा साधु यांनी पिंडाची स्थापना करुन जिवंत समाधी घेतली आहे. मंदिरासमोर पायर्यांना लागूनच समाधी आहे. नंतर सन 1955 मध्ये या जागृत देवस्थानाचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला दगड जयपूर(राजस्थान) येथून रेल्वेने नरडाणा मार्गे होळ येथे आणला होता. शिशे ओतून दगडाचे बांधकाम करण्यात आले आहे. या मंदिराची उभारणी कामी राजस्थानी कारागीर कार्यरत होते. हे काम अंदाजे 1948 पासून हाती घेतले होते.
राष्ट्रीय किर्तनकारांची हजेरी
मंदिर उभारणीचे काम साधारण 7-8 वर्षे चालले असून सन 1955 ला मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. मंदिर परिसरात महाशिवरात्रीला धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. रामनवमीला यात्रा भरते व गावातून श्री रामाची पालखी मिरवणूक उत्साहात साजरा होते. अष्टमीला नवस फेडले जातात. याठिकाणी मोठमोठे राष्ट्रीय किर्तनकारांचे किर्तनाचे कार्यक्रम झालेले आहेत. त्यात हभप सिन्नरकर महाराज, ओतूरकर महाराज, दिनानाथ गंदे महाराज, इंदूरीकर महाराज, सत्यपाल महाराज यांच्यासारखे अनेक राष्ट्रसंतांचे कार्यक्रम झालेले आहेत.
पर्यटनमंत्री रावलकडून अपेक्षा
या तीर्थक्षेत्राचा मोठ्याप्रमाणावर विकास करावा यासाठी होळ व परिसरातील ग्रामस्थांनी शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली आहे. या तीर्थक्षेत्रच्या ठिकाणी हरीनाम सप्ताहाच्या कार्यक्रमास व इतर वेळा देहू, आळन्दी, पंढरपूर, शेगांव, नाशिक, पुणे, तुळजापूर येथून मोठ्याप्रमाणावर संत, महंत,भाविक मुक्कामाला येत असतात.
जिप सदस्या सिसादे यांचे प्रयत्न
या तिर्थक्षेत्रास राज्य निकष समितीकडून ‘ब वर्ग’ दर्जा तिर्थक्षेत्र म्हणून मंजूरी मिळाली आहे. याठिकाणी राज्यस्तरीय तिर्थक्षेत्र विकास निधीतून दोन कोटी रुपयांची कामे प्रस्तावित असून सुरु आहेत. त्यात भाविकांसाठी भक्त निवास, सभामंडप, पार्किंगशेड, संरक्षण भिंत(कुंपण), अंतर्गत काँक्रिट रस्ता, पथदिवे, शौचालय व स्नानगृह आदी कामे सुरु आहेत. ही कामे गटाच्या जिप सदस्या संजीवनी सिसादे यांच्या प्रयत्नांनी झालेले आहे. याबाबत ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणावर आनंद व्यक्त करण्यात येत आहे असे सरपंच टी.के.पाटील यांनी सांगितले.