भुसावळ । सुरत-जळगाव रेल्वेच्या नवीन दुहेरी मार्गावर होळ ते अमळनेर या 33 कि.मी. मार्गाची चाचणी 29 मार्च रोजी पश्चिम रेल्वेच्या विभागीय अधिकार्यांच्या उपस्थितीत होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या सुरत-जळगाव या रेल्वे नवीन दुहेरी मार्गाचे काम अंतीम टप्प्यात असून 20 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता पश्चिम रेल्वेचे कमिश्नर ऑफ चीफ रेल्वे सेफ्टी अधिकारी सुशील चंद्रा, डिआरएम मुकूल जैन (मुंबई), वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक मुकेशकुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत होळ ते अमळनेर या नवीन 33 कि.मी. रेल्वे मार्गावर सीआरएस स्पेशल रेल्वे गाडी ताशी 160 कि.मी. वेगाने चालवून चाचणी घेण्यात येणार आहे.
दरम्यान सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपस्थित अधिकारी पुश ट्रॉलीने रेल्वे मार्ग व स्थानकांच्या व्यवस्थांची पहाणी करतील.सुरत-जळगाव या 304 कि.मी. दुहेरी रेल्वे मार्गावर पूर्वी 191 किमी मार्गाची चाचणी घेण्यात आली असून आता 33 कि.मी. अशा 224 कि.मी. मार्गाची चाचणी पूर्ण होणार आहे. या मार्गाच्या नवीन दुहेरीकरणासाठी अंदाजे 2 हजार 300 कोटींचा निधी खर्च झाला असून या संपूर्ण रेल्वे मार्गाचे काम मार्च 2018 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे रेल्वे काँट्रॅक्टर एल.के. गोयल यांनी सांगितले.