होवू घातलेल्या मद्य विक्री दुकानास रहिवाशांचा विरोध

0

जळगाव । शहरातील मेहरूण शिवार गट नं. 486 2अ येथे भुषण कॉलनी परिसारातल भक्ती कॉम्प्लेक्स असून या अपार्टमेंटमध्ये देशी, विदेशी मद्य विक्रीचे दुकानास परवानगी देण्यात येणार असल्याचे समजत असल्याने रहीवाशीक्षेत्रात मद्य दुकानास परवानगी देण्यात येवू नये अशी मागणी रहीवाशांची जिल्हाधिकार्‍यांकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली आहे.

विविध शैक्षणिक, धार्मिक स्थळे असल्याने विरोध
भक्ती अपार्टमेंटच्या तळमजल्यावर रिकामे दुकाने आहेत व या दुकानांवर पहिल्या तर तिसर्‍या मजल्यापर्यंत रहिवाशी प्लॅट आहेत. तसेच या अर्पार्टमेंटमधील तळमजल्यावरील दुकानांपासून पोस्टल कॉलनी परिसरातील श्रीहरी विठ्ठल मंदिर आहे. या मंदिराचे गेट व भक्ती अपार्टमेंटच्या दुकानाचे शटरमधील अंतर केवळ 34 मीटर आहे. त्याच्या बाजूला बालवाडी आहे. हा सर्व परिसरात रहिवाशी राहत असून विविध शैक्षणिक अस्थापना देखील आहेत. यात शासकीय अभियंत्रकी महाविद्यालय व त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह आहे. जवळच मुलजी जेठा महाविद्यालय असून या परिसरात मोठ्या संख्येन विद्यार्थी व विद्यार्थींनी राहतात. मद्य विक्रीच्या दुकानास परवानगी दिल्यास धार्मिक व शैक्षणिक अस्थापनांसाठी प्रसिद्ध असलेला हा भाग दुषीत होईल अशी चिंता निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. मद्य विक्रीचे दुकान सुरू झाल्यास परिसरातील महाविद्यालयातील, शालेय विद्यार्थींनी, महिलांना निर्भयपणे वावरण्यास शक्य होणार नाही. यातून गुन्हेगारींच्या घटना घडण्याची शक्यता निवेदनात वर्तविण्यात आली आहे. निवेदनावर धनंजय दिवकार भालेराव, दर्पण उद्धव पाटील, संगिता सूर्यकांत नाले, शरद वसंतराव पाटील आदी रहीवाशांच्या सह्या आहेत.