हौसलाच्या माध्यमातून कर्करोगाबद्दल करणार जनजागृती

0

एक्सीओमॅक्स आणि केडेन्स मीडिया यांच्या एकत्रित प्रयत्नाने हौसला या अल्बमची निर्मिती

मुंबई : जागतिक स्तरावरील कर्करोगाच्या विरोधात राबवल्या जाणार्‍या मोहिमेत संपूर्ण जग एकत्र येण्याचा दिवस म्हणजे जागतिक कर्करोग दिन. हा दिवस दरवर्षी चार फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. जागतिक कर्करोग दिनाचे उद्दिष्ट हे दरवर्षी जाणारे लाखो प्राण वाचवणे हे असून त्यासाठी कर्करोगाबद्दलची जनजागृती आणि शिक्षण यावर त्यामाध्यमातून भर दिला जातो. कर्करोग पीडित रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना प्रोत्साहित करणे आणि त्यांना धीर देणे या उद्देशाने एक्सीओमॅक्स आणि केडेन्स मीडिया यांनी संयुक्तपणे हौसला हा सांगितिक अल्बम तयार केला आहे. त्याचे वितरण जनहितार्थ केले जाणार आहे. यातील गाणी हिंदी, मराठी, बंगाली, तामिळ आणि कन्नड या पाच भाषांमध्ये आहेत.

हौसला या सांगितिक अल्बमच्या प्रकाशनाप्रसंगी फिल्म अभिनेता आनंद महादेवन, हौसलालाचे दिग्दर्शक हितेश मिश्रा, अभिनेता साहिल छाब्रा आणि एक्सीओमॅक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हौसला हे गाणे प्रख्यात पार्श्‍वगायक शान यांनी हिंदी, बंगाली आणि मराठी या भाषांमध्ये गायले आहे. तर विजय प्रकाश यांनी तामिळ आणि कन्नड या भाषेत गायले आहे. हिंदीतील गाणी रवी वासनेट यांनी लिहिले आहे. हौसलाची कथा, संकल्पना, संगीतरचना आणि दिग्दर्शन हितेश मिश्रा यांचे आहे. हौसलाचे गायक शान म्हणतात, हितेश यांनी अत्यंत कर्णमधुर असे गाणे संगीतबद्ध केले असून त्यातून लाखो लोकांना प्रेरणा मिळेल, अशी माझी पूर्ण खात्री आहे.

हौसलाचे दिग्दर्शक हितेश मिश्रा म्हणाले की, मला कर्करोग रुग्णांसाठी संगीताच्या माध्यमातून काहीतरी करायचे होते, कारण हे लोक असाध्य अशा रोगाशी झुंजत असतात. त्यांची इच्छाशक्ती संगिताच्या माध्यमातून वाढवणे आणि त्यातून त्यांना प्रेरित करणे यासाठी मी प्रयत्नशील आहे. जीवन हे खुप सुंदर आहे आणि कर्करोग हा बरा होऊ शकतो. त्यामुळे धीर सोडू नका, हाच संदेश त्यातून द्यायचा आहे. एक्सीओमॅक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार हे गेली 32 वर्षे आरोग्य निगा क्षेत्रात कार्यरत आहेत. ते म्हणाले, कर्करोगावर मात करताना कुटुंब आणि मित्रांकडून मिळालेले पाठबळ हे अत्यंत महत्त्वाचे असते.