साडेतीन लाखांच्या 11 दुचाकी जप्त
वाकडः गाडी वापरण्याची हौस भागविण्यासाठी आणि मौजमजा करण्याकरिता दुचाकी चोरणार्या सराईत गुन्हेगाराला वाकड पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून साडेतीन लाख रुपये किमतीच्या 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून वाकड आणि हिंजवडी ठाण्यातील दुचाकी चोरीचे 11 गुन्हे उघडकीस आले आहेत. अरबाज बशीर शेख (वय 21, रा. गहुंजे, ता. मावळ) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. वाकड पोलीस हद्दीत गस्त घाल होते.
त्यावेळी वाकड, थेरगाव परिसरातील दुचाकींची चोरी करणारा अरबाज हा पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाकड सर्व्हीस रोडवर थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता गाडी वापरण्याची हौस भागविण्यासाठी आणि मौजमजा करण्याकरिता दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी आज (शनिवारी) अटक केली आहे. अरबाज सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात तळेगाव दाभाडे आणि देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे, पोलिसांनी सांगितले.