क्रीडामंत्री विनोद तावडे यांची माहिती
मुंबई । भारतात पुढील महिन्यात होणार्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये येत्या १५ सप्टेंबरला एकाच दिवशी १० लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार असल्याची माहिती बुधवारी राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने राज्यात ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिफा अंडर १७ विश्वचषक स्पर्धेनिमित्त (FIF- U-17 World Cup India 2017) देशात एक कोटी १० लाख लोकांनी फुटबॉल खेळावा अशी कल्पना मांडली आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हा उपक्रम राबविला जाणार आहे.
महाराष्ट्र मिशन वन मिलियन योजनेअंतर्गत राज्यभरातील सुमारे ३० हजार शाळांमध्ये प्रत्येकी तीन याप्रमाणे एक लाख फुटबॉलचे वाटप केले जात आहे. प्रत्येक शाळेने फुटबॉल खेळणार्या किमान ५० विद्यार्थ्यांची नावे, पत्ते व आदी माहिती क्रीडा विभागाला कळविणे सुरू केले आहे. सुमारे १५ लाख विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
येत्या शुक्रवारी, १५ सप्टेंबरला सकाळी साडेनऊ वाजता मुंबई जिमखाना येथे राज्यपाल चे. विदयासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र मिशन वन मिलीयन या महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. त्यादिवशी बॉम्बे जिमखाना येथे आठ वेगवेगळे सामने होणार आहेत.
तीन लाख मुले खेळणार
मुंबई शहरात यादिवशी तीन लाखांहून अधिक मुले-मुली फुटबॉल खेळणार आहेत. त्यासाठी शाळा-महाविद्यालयांमधील मैदानांव्यतिरिक्त सुमारे २०० मैदानांची आखणी करण्यात आली आहे.
दिवसभर मुंबईतील मैदानांवर फुटबॉलचे सामने रंगणार आहेत. बुलढाणामध्ये आजोबा, मुलगा आणि नातू असे एकाच कुटुंबातील सदस्य फुटबॉलचा सामना खेळणार आहेत. विफा, एमडीएफए, खासगी क्लब, फुटबॉल मैदाने अशा सर्व ठिकाणी विविध संस्था-संघटनांच्या सहकार्याने मुंबई फुटबॉलमय होणार.
महाराष्ट्र मिशन वन मिलियन योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमासाठी शालेय क्रीडा शिक्षकांना या खेळाचे तांत्रिक ज्ञान देण्यात आले आहे.